बेअरस्टोच्या खेळीने इंग्लंडची कडवी झुंज

ख्राईस्टचर्च – यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोची शानदार नाबाद खेळी आणि त्याने बेन स्टोक्‍स व मार्क वूड यांच्या साथीत उभारलेल्या दोन बहुमोल भागीदाऱ्यांमुळे न्यूझीलंडविरुद्ध आज सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडला पहिल्या डावांत 8 बाद 290 धावांपर्यंत मजल मारता आली. आजचा खेळ संपला तेव्हा जॉनी बेअरस्टो 154 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकारासह नाबाद 97 धावांवर फलंदाजी करत असून जॅक लीच नाबाद 10 धावांवर त्याला साथ देत आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या इंग्लंडची सुरुवात पहिल्या कसोटीप्रमाणेच याही सामन्यात खराब झाली. त्यांचा भरवशाचा सलामीवीर ऍलिस्टर कूक केवळ 2 धावा करून बाद झाला. तर जेम्स व्हिन्से आणि डेव्हिड मेलन हे देखील केवळ 18 आणि 0 धावा करत तंबूत परतले. जो रूटने 37 व स्टोनमनने 35 धावा करीत थोडी झुंज दिली.

एकवेळ इंग्लंडचे 5 फलंदाज केवळ 94 धावांतच परतल्याने मागच्या वेळेप्रमाणेच पहिला डाव थोडक्‍यात आटपण्याची शक्‍यता निर्माण झाली होती, परंतु बेन स्टोक्‍स आणि जॉनी बेअरस्टोने इंग्लंडचा डाव सावरला. बेअरस्टो व स्टोक्‍स या जोडीने सहाव्या विकेटसाठी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बोल्टने बेन स्टोक्‍सला (25) बाद करून ही जोडी फोडली. स्टुअर्ट ब्रॉडही (5) अपयशी असल्याने इंग्लंडची पुन्हा 7 बाद 164 अशी अवस्था झाली होती.

याच वेळी एक बाजू समर्थपणे सांभाळणाऱ्या बेअरस्टोने मार्क वूडच्या साथीत 95 धावांची भागीदारी करीत पुन्हा इंग्लंडचा डाव सावरला. मार्क वूडने 62 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यास दहा षटके बाकी असताना साऊदीने त्याला बाद करत पाचवा बळी घेतला. ट्रेन्ट बोल्टने तीन गडी बाद करताना साऊदीला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – पहिला डाव – 90 षटकांत 8 बाद 290 (जॉनी बेअरस्टो नाबाद 97, मार्क वूड 52, जो रुट 37, मार्क स्टोनमन 35, टिम साऊदी 60-5, ट्रेन्ट बोल्ट 79-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)