“बॅचलर्स’ना निवारा मिळेना!

पिंपरी – देशभरातून पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण, नोकरीसाठी युवक मोठ्या प्रमाणात येत आहे. या विद्यार्थ्यांसाठी शहर नवीन असल्याने राहण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. काही ठिकाणी “मध्यमवर्गीय’ व “उच्चभू’ सोसायटीधारक युवकांना भाड्याने घर देण्यास नकार देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना दोषी ठरवून राहण्यासाठी नकारघंटा वाजविणे चुकीचे असल्याचे, मत अनेक विद्यार्थ्यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर दिवसें-दिवस विकासात्मक दृष्टीने गती घेत आहे. शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक अंगाने शहरात बदल होताना दिसत आहेत. शैक्षणिक दृष्टीने विचार करता शहरात अनेक मोठमोठ्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालये, विविध कार्यालये आहेत. हिंजवडी व तळवडे आयटी पार्कमुळे हजारोंच्या संख्येने शहरात युवा नोकरदार दाखल झाला आहे. शिक्षण व नोकरीनिमित्त बाहेर गावावरुन शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थी राहण्यासाठी फ्लॅट घेताना धावपळ करताना दिसतात. अशा वेळी अनेक सोसायटी धारकांचे उंबरठे झिजवूनही काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येत असल्याने गोंधळ उडताना दिसत आहे. काही विद्यार्थ्यांचा आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो हे तितकेच खरे आहे. मात्र, सरसकट सर्व विद्यार्थी त्याच पध्दतीने वागणारे नसतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घर शोधताना अनंत अडचणींचा सामना युवकांना करावा लागतो. बहुसंख्य ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्‍न म्हणून मुलींना राहण्यासाठी जागा दिली जात नाही. या क्षेत्रात “एजंटगिरी’ जोरात आहे. हे “एजंट’ घरे दाखवण्याच्या नावाखाली तरुणांकडून पैसे उकळतात. एखादे घर “फिक्‍स’ केल्यानंतर त्यामागे “कमिशन’ उकळले जाते. घर मिळाल्यानंतर करारनामा केला तरी घर मालक कधीही घर खाली करायला भाग पाडतात. मात्र, मुदतीच्या आधी घर सोडल्यास पुढील महिना-दोन महिन्याचे भाडे उकळले जाते. गैरसोय टाळण्यासाठी गरजू तरुण याविरोधात दाद मागायला पुढे येत नाहीत.

“”आम्ही दोन महिन्यापूर्वी पिंपरी शहरात घराच्या शोधात होतो. मात्र, कित्येक सोसायटीच्या प्रवेशव्दारा शेजारी “बॅचलर’ विद्यार्थ्यांनी चौकशी करु नये’ अशा आशयाचे फलक लावलेले होते. यामुळे, निर्व्यसनी, चांगल्या सुसंस्कारित कुटुंबातून येऊनही आपल्याला घर मिळत नसल्याचे वाईट वाटले,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रयाग चौधरी या विद्यार्थ्यांने दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.

“”शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्लॅट मिळतात. मात्र, मोठ-मोठे सोसायटीधारक विद्यार्थ्यांना ठेवण्यास नकार देतात. काही मुले, मुली रात्री-अपरात्री येऊन धिंगाणा घालत आजूबाजूच्या नागरिकांना त्रास देतात. यामुळे, चांगल्या मुलांनाही याचा फटका बसत असल्याचे,” पिंपरीतील थ्री-वन सोसायटीतील रहिवासी जग्गनाथ पाठक यांनी सांगितले.

भाडे शुल्कावर नियंत्रण नाही
शिक्षण अथवा नोकरीचा कॉल येताच युवकांची घर शोधताना परवड होते. निगडी-प्राधिकरण, तळवडे, हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, संत तुकारामनगर, भोसरी, पिंपळे गुरव हे भाग “बॅचलर्स’साठी प्रसिध्द आहेत. काही ठिकाणी केवळ मुलींसाठी तर काही ठिकाणी फक्त मुलांसाठी राहण्याची सोय असे फलक झळकताना दिसतात. कम्बाईन स्वच्छतागृह, स्वयंपाकास मनाई, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू वापरास मनाई, नातेवाईकांना आणण्यास मनाई अशा असंख्य अटी-शर्तींचा सामना करत कशीबशी राहण्यासाठी जागा मिळते. त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या भाडेशूल्कावर कोणाचेही नियंत्रण नाही. भोसरीसारख्या ठिकाणी एका खोलीत अक्षरशः पंधरा ते वीस विद्यार्थी दाटीवाटीने राहतात. स्वच्छतेकडे पुर्णतः दुर्लक्ष केले जाते. घराच्या रंगरंगोटीसाठी देखील त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. घर सोडताना अनेकांचे “डिपॉझिट’ देखील बुडवले जाते. घर मालकांच्या या मनमानीला चाप लावण्याची मागणी होत आहे.

सोसायटी धारकांच्या सुरक्षिततेसाठी फ्लॅट देताना विद्यार्थ्यांचे आधार, पॅनकार्ड यासारखी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन स्थनिक पोलीस स्थानकात अर्ज भरुन सोबत जोडली जातात. सुरक्षिततेच्या सर्व बाबींची परिपूर्ण पडताळणी केली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करुनही काही सोसायटीधारक फ्लॅट देण्यास नकार देतात. तसेच, अनेक ठिकाणी सोसायटी धारकांकडून विद्यार्थ्यांना अपराधीपणाची वागणूक मिळते.
सुमीत वडमारे, विद्यार्थी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)