बॅग्जच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी : व्हीआयपी इंडस्ट्रीज

आता सुट्टीचा सिझन सुरू झाला. ट्रिपला कुठे जायचे? विमानाने की रेल्वेने? प्रवासाबद्दल विचार चालू होतो तेव्हा पहिल्यांदा मनात येते ते म्हणजे बॅग. आणि बॅग म्हटले की, समोर नाव येते व्हीआयपी इंडस्ट्रीज. पूर्वीचा वळकटी किंवा पत्र्याच्या ट्रंकांचा जमाना केव्हाच मागे पडला. आता मोल्डेड किंवा सॉफ्ट, निरनिराळ्या रंगाच्या स्टायलीश आणि हॅंडल धरून आरामात चाकावर ओढून नेता येतील अशा टिकाऊ आणि त्याचबरोबर वजनाला हलक्‍या बॅगांना लोकांची पसंती असते. त्यासाठी एकच नाव घेतले जाते आणि ते म्हणजे व्हीआयपी.

या कंपनीची सुरुवात 27 जानेवारी 1968 मध्ये अरिस्टो प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने झाली. 1971 मध्ये ही कंपनी ब्लोप्लास्ट लिमिटेड या कंपनीची उपकंपनी बनली. व्हीआयपी इंडस्ट्रीज हे नाव कंपनीला 1982 मध्ये प्राप्त झाले.

1979 मध्ये महाराष्ट्रात नाशिक येथे कंपनीने मोठ्या प्रमाणात बॅग्जचे उत्पादन सुरू केले. महिन्याला 60000 पेक्षा जास्त बॅग्ज बनवण्याची क्षमता त्यावेळी नाशिकच्या कारखान्याची होती. 1982 मध्ये कंपनीने जळगाव येथे सॉफ्ट लगेज बनवण्याचे दुसरे मोठे युनिट सुरु केले. स्कायबॅग्ज नावाने चालू केलेली ही उत्पादने पाहता पाहता लोकप्रिय झाली. आजही या उत्पादनांची लोकप्रियता टिकून आहे.

या उत्पादनांना आजही ग्राहकांकडून पसंतीची पावती मिळते आहे. या पाठोपाठ आणखी एक युनिट नागपुरला सुरू झाले. 1986 ला इंटरनॅशनल टुरिस्टर आणि ओडेसी हे त्यांचे प्रसिद्ध ब्रॅंड बाजारात आले आणि व्हीआयपी नाव सर्वांच्या माहितीचे आणि लोकप्रिय बनले.
लोकांच्या प्रतिसादाबरोबर कंपनीच्या प्रगतीची घोडदौड चालू होतीच. 2001 मध्ये

व्हीआयपीने फ्रान्सच्या कंपनीबरोबर सहकार्याचा करार करून डेल्से ब्रॅंड बाजारात आणला. हा ब्रॅंडदेखील लगेचच लोकप्रिय ठरला. या सुमारास या कंपनीला जर्मनीसारख्या औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या देशातून 55000 बॅग्जची मागणी आली. आपल्या यशाच्या जोरावर ह्या कंपनीने कार्ल्टन इंटरनॅशनल ही इंग्लंडमधील कंपनी ताब्यात घेतली आणि परदेशात भक्कम पाऊल टाकले. काही वर्षात बांगला देशातही स्वतंत्र कपंनी चालू केली.

सहज, सोपा प्रवास हे कंपनीचे ध्येय होते आणि लोकांचा प्रतिसादही जोरदार होता. ग्राहकांच्या मागणीनुसार, आवडीनुसार व्हीआयपीने आपली निरनिराळी उत्पादने बाजारात आणली. त्यांची प्रत्येक उत्पादने कंपनीच्या यशात भर घालत होती. बॅग्ज तर होत्याच पण त्याबरोबर कॉलेजियन्स आणि तरुण पिढीसाठी बॅकपॅक्‍स, नोकरदारांसाठी बिझनेस बॅग्ज, तरुणी व स्त्रियांच्या आवडीच्या डफल्स, ब्रीफकेसेस तर विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्ज, रेनकोट सगळीकडे व्हीआयपी नाव झळकत आहे.

व्हीआयपी, अरिस्टोक्रॅट, अल्फा, फूटलूज, स्कायबॅग्ज, कार्लटन असे अनेक नामांकित ब्रॅंड या कंपनीच्या मालकीचे आहेत. कॅप्री पर्सेस तर तरुणींमध्ये क्रेझ निर्माण करत आहेत.
आतापर्यंत सहा कोटींपेक्षा जास्त बॅग या कंपनीने विकल्या आहेत. दरवर्षी निरनिराळ्या सुधारणा आणि कल्पना घेऊन कंपनी येत असते. आज भारतात 8000 पेक्षा जास्त दुकाने या कंपनीची असून 27 पेक्षा जास्त देशांमध्ये 1300 पेक्षा जास्त ठिकाणी विक्रीची व्यवस्था आहे.

या सर्वांमुळे अतिशय कमी कर्ज असलेल्या या कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. चला तर छान, स्टायलिश आणि वजनाला हलकी बॅग घेऊन निघू या प्रवासाला. पण त्या आधी या कंपनीच्या शेअरमध्ये तर गुंतवणूक करू या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)