बॅंक घोटाळ्यापासून शेअर गुंतवणूकदार सावरले

आशावाद वाढला


सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकांत मोठी वाढ

मुंबई- पीएनबीतील मोठ्या घोटाळ्यानंतर भांडवलबाजारात निर्माण झालेले नकारात्मक परिणाम आता संपुष्टात आले आहेत. त्याची जागा आता आशावादाने घेतली आहे. या आठवड्यात वाढीव विकासदराची आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणयाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शुक्रवारी निर्देशांक जसे उसळले होते तसे सोमवारीही उसळले.

बॅंक घोटाळ्यामुळे गेल्या पंधरवड्यात शेअरबाजारातील वातावरण नकारात्मक झाले होते. मात्र, आता ती लाट ओसरली आहे. या आठवड्यात राष्ट्रीय उत्पन्न आणि औद्योगिक उत्पन्नाचे परिणाम जाहीर होणार आहेत. त्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जागतिक बाजारातूनही चांगले संकेत आल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअरबाजारात मोठी खरेदी झाल्याचे दिसून आले.
– विनोद नायर,संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा

तिसऱ्या तिमाहीच्या विकासदराची आकडेवारी बुधवारी जाहीर होणार आहे. हा विकासदर एकूण वातावरण पाहता 7 टक्‍के इतका असेल असे मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने म्हटले आहे. औद्योगिक उत्पादनही वाढण्याची शक्‍यता असल्याचे विश्‍लेषक मानतात. त्यातच जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केल्याने निर्देशांक उंचावले.

या कारणामुळे सकाळपासूनच मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स उच्च पातळीवर राहिला. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स 303 अंकांनी म्हणजे 0.89 टक्‍क्‍यांनी वाढून 34445 अंकांवर बंद झाला. 5 फेब्रुवारीनंतर निर्देशांक पुन्हा या पातळीवर आला आहे. शुक्रवारीही सेन्सेक्‍स 322 अंकांनी वाढला होता. मोठ्या कंपन्यांकडे आता पुन्हा गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे. सोमवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 91 अंकांनी म्हणजे 0.87 टक्‍क्‍यांनी वाढून 10582 अंकांवर बंद झाला.

आजच्या तेजीचे नेतृत्व रिअॅल्टी, भांडवली वस्तू, बॅंकिंग, पायाभूत सुविधा, धातू, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि ग्राहक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी केले. या क्षेत्रांचे निर्देशांक 3.30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.
भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेबाबत देशातील संस्थागत गुंतवणूकदार कमालीचे आशावादी आहेत. त्यांनी शुक्रवारी 1514 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

तर परदेशातील गुंतवणूकदार तूर्त नफा काढून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी शुक्रवारी 486 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरचीही खरेदी झाल्यामुळे सोमवारी स्मॉल कॅप 0.88 टक्‍क्‍यांनी वाढला तर मिडकॅप 0.74 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले. एकूण बाजारात सकारात्मक वातावरण असतानाही घोटाळा झालेल्या पीएनबीचे शेअर सोमवारीही 1.32 टक्‍क्‍यांनी तर गीतांजली जेम्सचे शेअर 0.74 टक्‍क्‍यांनी कमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)