बॅंक कर्मचारी असल्याचे सांगून महिलेला 97 हजारांना लुटले

बॅंक कर्मचारी असल्याचे सांगून महिलेला 97 हजारांना लुटले
पुणे, दि.30 – बॅंक कर्मचारी असल्याच्या बतावणीने चोरट्याने डॉक्‍टर महिलेकडील 97 हजार 500 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या आवारात घडली. यासंदर्भात डॉ. अंकिता शिरकांडे (31, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरकांडे दाम्पत्य डॉक्‍टर आहेत. त्यांचा सहकारनगर भागात दवाखाना आहे. डॉ. अंकिता शुक्रवारी पुणे-सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत सकाळी साडेअकराच्या सुमारास गेल्या होत्या. डॉ. अंकिता 97 हजार 500 रूपयांची रोकड भरण्यासाठी रांगेत थांबल्या होत्या. रोकड मोजत असलेल्या डॉ. अंकिता यांना चोरट्याने पाहिले. त्यानंतर भामट्याने त्यांना टाचणी देण्याचा बहाणा केला. बॅंकेत कर्मचारी असल्याची बतावणी त्याने केली. त्यानंतर भामट्याने बॅंक व्यवस्थापक कामानिमित्त बाहेर पडणार आहेत. बॅंक लवकर बंद करण्यात येणार आहे, अशी बतावणी त्यांच्याकडे केली. डॉ. अंकिता यांना मदत करण्याचा बहाणा करत मी रोकड भरतो, असे चोरट्याने त्यांना सांगितले. चोरट्याने केलेल्या बतावणीवर त्यांनी विश्वास ठेवला. डॉ. अंकिता यांनी चोरट्याकडे रोकड दिली. त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. दरम्यान, त्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. डॉ. अंकिता यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्याला टिपले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)