बॅंक अधिकाऱ्यांच्या जामिनाबाबत पोलीस, विशेष सरकारी वकिलांमध्ये एकमत नाही

अटी, शर्ती जामीन द्यावे, पोलिसांचे म्हणणे


तर विशेष सरकारी वकिलांचा जामिनास विरोध

पुणे – रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमाचे उल्लघन करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांना कर्ज दिल्याप्रकरणात अटक करण्यात आलेले बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्या जामिनाबाबत पोलीस आणि विशेष सरकारी वकिलांमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अटी आणि शर्थीवर तीन्ही आजी-माजी अधिकाऱ्यांना जामीन द्यावा, असे म्हणणे न्यायालयात सादर केले आहे. तर, तीघांच्या जामिनास आपला विरोध असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केला. दरम्यान तिघांच्या जामिनावर उद्या (शुक्रवार दि. 29 जून) सुनावणी होणार आहे. तर डी. एस. कुलकर्णी लि.चे उपाध्यक्ष राजीव नेवासकर, सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांच्या जामीन उद्या (शुक्रवारी) युक्तीवाद होणार आहे.
पोलिसांकडून सादर करण्यात आलेले म्हणणे सकारात्मक असले तरी सरकारी वकिलांकडून न्यायालयात घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात गुप्ता, मुहनोत, देशपांडे, नेवासकर, घाटपांडे यांच्या वकिलांनी जामीन अर्ज सादर केला आहे. गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांच्यावतीने ऍड. हर्षद निंबाळकर, घाटपांडे यांच्या वतीने ऍड. एस. के. जैन, नेवासकर यांच्याकडून ऍड. रोहन नहार यांनी जामीन अर्ज सादर केला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना काही अटी आणि शर्थींवर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांना ही जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती ऍड. निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली.
ऍड. जैन आणि ऍड. नहार हे शुक्रवारी (29 जून) न्यायालयात युक्तीवाद करणार आहे. दरम्यान, सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचे ऍड. जैन यांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांकडून गुप्ता, मुहनोत, देशपांडे, नेवासकर, घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले. आरोपींकडून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना काही अटी आणि शर्थींवर जामीन देण्यात यावा, असे म्हणणे पोलिसांकडून लेखी स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींना जामीन देऊ नये, असे न्यायालयात सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापूर्वी विशेष न्यायालयाकडून तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत, असे ऍड. चव्हाण यांनी न्यायलयात सांगितले. पोलिसांकडून लेखी स्वरूपात मांडण्यात आलेले म्हणणे तसेच सरकारी वकिलांची भूमिका वेगळी असल्याने बचाव पक्षाच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुप्ता, मुहनोत, देशपांडे, घाटपांडे, नेवासकर यांना विशेष न्यायालयाने 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)