पोलीस सुत्रांचा दावा : यापूर्वीच मिळाले होते “अलर्ट’?

पुणे – कॉसमॉस बॅंकेच्या “सिक्‍युरिटी सिस्टीम’ आणि “ऑडिट’मध्येच काही त्रुटी आढळल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. संबंधित “सायबर दरोडा’प्रकरणात “व्हिसा’ आणि “स्विफ्ट’ सिस्टीमने दोन महिने बॅंकेला वेळोवेळी घडलेल्या काही घटनांतून “अलर्ट’ केले होते. मात्र ही किरकोळ बाब समजून त्याकडे दुर्लक्ष केले गेले असावे. हॅंकरने हा दरोडा एका दिवसात टाकलेला नाही. त्याने किमान सहा ते सात महिन्यांपासून बॅंकेच्या सिक्‍युरिटी सिस्टीममधील त्रुटी शोधल्या. त्यानंतरच सायबर दरोडा टाकण्यास सर्वांत सोपी बॅंक म्हणून यावर दरोडा टाकल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी बांधला आहे.

परदेशांसह भारतातही इंदौर, अजमेर, कोल्हापूर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 2 हजार 800 व्यवहारांमार्फत 2 कोटी 50 लाख रुपये रुपी कार्डद्वारे एटीएममधून काढण्यात आले आहे. तर, स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शनद्वारे हॉंगकॉंग येथील एका बॅंकेत 13 कोटी 92 लाख रुपये परस्पर जमा करुन काढण्यात आले आहे. संबंधित कार्डचा वापर करताना कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांच्या कार्डस्‌ची माहिती कशाप्रकारे चोरी झाली आहे, तसेच त्याचे “क्‍लोन’कार्ड कसे तयार करण्यात आले याबाबत पोलीस तपास करत आहे. चौकशीदरम्यान, काही ठिकाणी बॅंकेच्या मुदत संपलेल्या कार्डस्‌चा ही वापर झाल्याचे दिसून आले आहे. तसेच एटीएम सेंटरमध्ये अत्यल्प सेंकदात अनेक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फसवणुकीची नेमकी सुरूवात कोठे आणि कशी झाली, याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

ग्राहकांच्या “क्‍लोन’कार्ड सूत्रधाराचा शोध
कॉसमॉस बॅंकेचा पेमेंट सिस्टम सर्व्हर हॅक करुन व्हिसा आणि रुपे कार्डच्या माध्यमातून 94 कोटी 42 लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणांवरुन 14 हजार 849 व्यवहारांद्वारे परस्पर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी व्हिसा आणि रुपे कार्ड मोठ्या प्रमाणात “क्‍लोन’ करून त्याचा वापर केल्याचे विशेष तपास पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेमके कार्ड “क्‍लोन’ कशाप्रकारे केले, यामध्ये कार्ड नंबर आणि पिन कोणत्या स्वरुपात तयार झाले आणि यामागे संगनमताने कट रचलेल्या सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.

28 देशांशी पत्रव्यवहार
भारतासह पोलंड, रशिया, यूएई, कॅनडा, चीन, इंग्लंड, अमेरिका, तुर्की अशा विविध 28 देशांत 78 कोटी रुपये प्रत्यक्षरित्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन व्हिसा कार्डद्वारे 12 हजार आर्थिक व्यवहारांद्वारे काढण्यात आले आहे. त्यामुळे पैसे नेमके कोणी काढून नेले, याबाबत संबंधित एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळावे. तसेच आरोपींबाबत काही धागेदोरे हाती लागण्यासाठी “एसआयटी’मार्फत 28 देशांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)