बॅंका लवकर पूर्वपदावर आणू – पियुष गोयल

एनपीए अगोदरच्या सरकारमुळे 
नवी दिल्ली – घोटाळे आणि अनुत्पादन मालमत्तामुळे कमकुवत झालेले बॅंकिंग क्षेत्र लवकरच पूर्वपदावर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. बॅंकिंग क्षेत्राची वाढ निकोप पद्धतीने व्हावी याकरिता उपाययोजना करण्यात येणार आहेत. बॅंकांच्या व्यवहारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. अरुण जेटली आजारी असल्यामुळे गोयल यांच्याकडे काही काळ अर्थमंत्रिपद देण्यात आले आहे.
गोयल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. जेटली यांचे आरोग्य वेगाने सुधारत आहे. काल आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी काही मुद्द्यावर आपल्याला भर देण्यास सांगितले आहे. त्या आधारावर आपण काम करीत असल्याचे गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले की, अगोदरच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेल्यामुळे बॅंकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, विविध क्षेत्राचा विचार न करता त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी कर्ज दिले गेले. त्यानंतर त्या कंपन्यांकडून कर्जाची परतफेड झालेली नाही. काही क्षेत्रात मंदी निर्माण झाल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेवर आणि ताळेबंदावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे बॅंकांची कर्जवसुली झाली नाही आणि आता बॅंकांना तोटा होऊ लागला आहे. ऊर्जा, मोबाईल, पोलाद क्षेत्रातील कंपन्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात थकलेले आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून बॅंकांतील काही घोटाळे बाहेर आले आहेत. त्यामुळे बॅंकांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. बॅंकांचे व्यवस्थापन, हजारो कर्मचारी आणि रिझर्व्ह बॅंकेच्या सहाय्याने बॅंकांना या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे. हे काम कमीत कमी वेळेत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अगोदरच्या काळात कर्ज वितरणावर भर दिला गेला. मात्र बॅंकांच्या कामकाजावर आणि कर्ज वसुलीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. आता नव्या सरकारने त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. सरकारने बॅंकांना कर्जवसुलीसाठी पुरेसे अधिकार दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकही इतर बॅंकांच्या कामकाजाकडे लक्ष देत आहे. त्यामुळे परिस्थितीतही सुधारणा होत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना कर्जाची पुनर्रचना करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे त्या कर्जाचा समावेश अनुत्पादक मालमत्तेत होत आहे. वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेमुळे बॅंकांना अधिक तरतूद करावी लागत आहे. त्यामुळे बॅंकांचा तोटा वाढत आहे. मात्र यामुळे लघु पल्ल्यात जरी बॅंकांच्या कर्ज वितरणावर परिणाम होत असला तरी दीर्घ पल्ल्यात या बाबी चांगल्या असल्याचे या क्षेत्रातील विश्‍लेषकांनी सांगितले आहे. बॅंकांच्या अडचणींचा एकूण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.

यूपीए सरकारच्या काळात ऊर्जा, मोबाइल, पोलाद क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्जाचे वितरण करण्यात आले होते. आता या कर्जाची वसुली होत नसल्यामुळे बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या सहाय्याने यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
– पियुष गोयल, केंद्रीय अर्थमंत्री 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)