बॅंकांना मदत करणेही अवघड झाले – अरविंद सुब्रह्मण्यम

भांडवल दिले जात असतानाच घोटाळे झाले उघड

नवी दिल्ली -सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांत मोठ्या सुधारणा करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यांच्याकडून बॅंकिंगचे मूलभूत काम होईल की नाही याबाबत शंका येणारे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांची मालकी कोणाकडे असावी यावर फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे अर्थमंत्रालयाचे मुख्य सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी सांगितले आहे.

या बॅंकांनी मोठ्या उद्योगांना दिलेले कर्ज परत आले नसल्यामुळे या बॅंकांच्या ताळेबंदावर परिणाम झालेला आहे. सरकारकडे फारसा पैसा नसतानाही या बॅंकांना सरकार मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या महिन्यात या बॅंकांत झालेले मोठे घोटाळे बाहेर आले आहेत. त्यामुळे आता या बॅंकांना सरकारला मदत करणे अवघड झाले आहे. सरकारने या बॅंकांना भांडवली मदत देण्याबरोबर कर्जवसुलीसाठी अधिक अधिकार दिले होते. आता या बॅंकांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, अनुत्पादक मालमत्ता वाढली असतानाच या बॅंकांत झालेले मोठे घोटाळे बाहेर आले आहे. त्यामुळे ज्यातून परतावा मिळण्याची शक्‍यता नाही, अशा ठिकाणी सरकारने गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दिल्लीतील विद्यार्थ्याशी बोलताना ते म्हणाले की, आता या बॅंकांची मालकी कोणाकडे असावी यावरच विचार करण्याच गरज निर्माण झाली आहे. आता या क्षेत्रात पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. या बॅंकांनी आतापर्यंत खरी परिस्थिती सांगितली नाही. त्यामुळे आता अनुत्पादक मालमत्ता वाढल्याचे दिसून येत आहे. आता ताळेबंद स्वच्छ करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना भांडवल दिले जात आहे. मात्र आता घोटाळ्यामुळे ती मदत करीत राहणे अवघड जाणार असल्याचे ते म्हणाले.

भारताने जर मॅन्युफॅक्‍चरींगकडे लक्ष दिल नाही तर भारताची अर्थव्यवस्था रुळावरून घसरू शकते या नोबेल परस्कार विजेते पॉल क्रुगमन यांच्या वक्‍तव्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपण मॅन्युफॅक्‍चरिंगकडे 25 वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आताची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे खरे आहे. मॅन्युफॅक्‍चरिंगमुळे इतर अनेक देश भारताच्या पुढे गेले असल्याचे त्यांनी सांगितले. आता ऑटोमेशनमुळे मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रात पूर्वीइतका रोजगार निर्माण होण्याची शक्‍यता कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता त्यासाठी भारताला बांधकाम, कृषी आणि सेवा क्षेत्रांकडे भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारताला जर मोठा विकासदर गाठायचा असेल तर त्यासाठी फक्त देशातील बाजारपेठेवर अवलंबून चालणार आहे. त्यासाठी आपल्याला निर्यात वाढवावी लागणार आहे. आतापर्यंत कोणताही मोठा देश निर्यात वाढविल्याशिवाय विकसित झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)