बुधवारी पाणी वाटपाची चर्चा

मुंबईत होणार बैठक; पीएमआरडीएसाठी स्वतंत्र समिती


8 टीएमसी पाणी “पीएमआरडीए’ला देण्यावर चर्चा

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर समितीची पहिली बैठक महापालिका आयुक्तांच्या परदेशवारीमुळे रद्द झाली होती. ही बैठक येत्या बुधवारी (दि.26) मुंबईत होणार आहे. महापालिकेला खडकवासला धरणसाखळीतून देण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करून 8 टीएमसी पाणी पीएमआरडीएसाठी देण्याबाबत निर्णय होणार आहे. पीएमआरडीएच्या सहा प्रमुख गावांसह इतर गावांसाठी ही पाण्याची मागणी झाली आहे.

पुण्याच्या पाणी वापरात काटकसर करून 8 टीएमसी पाणी “पीएमआरडीए’ला देता येईल, असा अहवाल जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. महापालिकेने मात्र पुण्याच्या पाण्यात कपात करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या चर्चेवर भविष्यातील शहराची पाण्याची स्थिती निश्‍चित होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणांतून जिल्ह्यातील काही गावांबरोबरच शेतीलाही पाणी सोडले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराची वाढ वेगाने झाल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाणी वाटपावरून शहर आणि ग्रामीण असा वाद सातत्याने होत आहे. त्यातच आता “पीएमआरडीए’नेही त्यांच्या हद्दीसाठी 3 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने नगरविकास प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती पाणी वाटपाबाबत नव्याने निर्णय घेणार आहे. या समितीची पहिली बैठक 14 सप्टेंबर रोजी मुंबईत बोलविण्यात आली होती. मात्र, महापालिका आयुक्त सौरभ राव हे परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. ही बैठक बुधवारी होणार आहे.

अशी आहे पाण्याची सद्यस्थिती
सध्या महापालिका दरवर्षी 16 टीएमसी पाणी उचलत आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेला 2017 पर्यंत 8.19 टीएमसी पाणी मंजुर केले आहे. त्यानुसार महापालिकेने पाणी वापरात बचत केल्यास उर्वरीत 8 टीएमसी पाणी “पीएमआरडीए’ला देणे शक्‍य असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने एप्रिलमध्ये दिला आहे. पण, शहराची लोकसंख्या 48 लाखांवर पोहोचली असून सध्या जे पाणी उचलले जात आहे, त्यात काटकसर करता येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतरही जलसंपदा विभाग महापालिकेने काटकसर केल्यास पाणी देणे शक्‍य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे ही समिती काय निर्णय घेणार यावर पुणे शहराच्या पाण्याचे भवितव्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)