बुद्धिमान परिधानं 

डॉ. मेघश्री दळवी 

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार असे आजूबाजूला सगळेच स्मार्ट होत असताना परिधान करता येण्याजोगी साधनं कशी मागे राहतील? यात खरी सुरुवात केली ती ऍपलच्या वॉचने. मग आली हातावर बांधण्याची फिटबिट किंवा सॅमसंगसारखी फिटनेस ट्रॅकर्स. त्यातले काही दंडावर किंवा मांडीवरसुद्धा लावता येतात. आणि आता त्यात भर पडली आहे बूट, कॅप, हेल्मेट, बॅकपॅक,आणि चक्क कपड्यांची! 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिधानीय तंत्रज्ञान (वेअरेबल टेक्‍नॉलॉजी) गेल्या दहा वर्षांमध्ये अक्षरश: बहरलंय. मागच्या वर्षी जगभरात अशी अकरा कोटी साधनं विकली गेलीत! ही परिधानीय साधनं वजनाने हलकी असतात. प्रवासातले धक्के पचवण्यासाठी शॉकप्रूफ, पावसापाण्यासाठी वॉटरप्रूफ असतात. त्यांची बॅटरी दीर्घकाळ चालल्यास उत्तम. इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी तर हवीच. सोबत जीपीएस यंत्रणा, कंपास असल्यास त्यांचा वापर अनेक प्रकारे करता येतो. हेल्थ ट्रॅकिंग साधनांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीशी संबंधित ब्लडप्रेशर किंवा हृदयाचे ठोके मोजण्याची सोय असते. स्मार्ट बॅकपॅकमध्ये चार्जिंगसाठी पॉवर बॅंकेची सोय, त्यासाठी सोलर सेल, यूएसबी आणि हेडफोन्स लावण्याची सुविधा, चोरीचा प्रयत्न झाल्यास अलार्म होईल असं कुलूप, एलईडी दिवा अशा नाना तर्हेकच्या गोष्टी मिळतात.

येत्या दोन-तीन वर्षांत या परिधानीय साधनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मोठया प्रमाणात दिसायला लागेल. फिटनेस आणि स्पोर्टस या क्षेत्रात हालचालींची नोंद घेणे आणि त्यातून योग्य निष्कर्ष काढून पुढचा मार्ग सुचवणे, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होईल. धावपटू आणि गोल्फ खेळाडू यांच्यासाठी अशी साधनं नुकतीच उपलब्ध झाली आहेत. फिटनेस हेल्थ ट्रॅकर साधनं वेगवेगळ्या नोंदी घेत असतात. त्यांच्यात रक्तपरीक्षण, ग्लुकोज पातळी, दिवसभरचा व्यायाम, चाललेलं अंतर, पायऱ्यांची चढ-उतार, पोटात गेलेल्या कॅलरीज, झोपेचं प्रमाण मोजून त्यावरून एकंदरीत आरोग्याचा अंदाज घेतला जातो. यात हळूहळू ईसीजी नोंदींवरून संबंधित सूचना, स्मार्ट वजनमापकाकडून अलार्म,हवेची परीक्षा करून दम्याचा त्रास असलेल्यांसाठी इनहेलर आपोआप सुरू होण्याची व्यवस्था अशा गोष्टी येऊ घातल्या आहेत. इथेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उत्तम वापर होईल.

कपड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवायला आता सुरुवात होते आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने याचा नक्कीच फायदा होईल. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांचा ठावाठिकाणा कायम समजू शकला तर कुटुंबीय निर्धास्त राहू शकतील. तसंच अपघात किंवा दुर्घटनेच्या वेळी आपले नातेवाईक शोधून काढणे सोपे जाईल. जीपीएस तंत्रज्ञान, ब्लूटूथ, किंवा मोबाईल तंत्रज्ञान वापरून पाळीव प्राण्यांसाठी अशी साधनं मिळायला लागली आहेत. कुत्र्यांसाठी तर स्मार्ट शिटी आहे. आपला लाडका कुत्रा काय करत आहे याचा माग ठेवणं या शिटीने सहज शक्‍य होईल. त्याच्या आवडीनिवडीनुसार त्यात वेगवेगळी सेटिंग करण्याची सोय आहे. तेव्हा उद्या घराबाहेर पडताना काही विसरलं तरी काळजी नको. अंगावरची ही परिधानीय बुद्धिमान साधनं स्वत:च आठवण करून देतील!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)