बुगडी माझी सांडली गंऽ…

बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला ऽ
गं जाता साताऱ्याला ऽऽ.

आशा भोसले यांचा आवाज आणि जयश्री गडकर यांच्या नृत्यावर आधारित या लावणीने अख्ख्या महाराष्ट्राला येड लावलं होतं. साठच्या दशकातील “सांगत्ये ऐका’ चित्रपटातील ही लावणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती चित्रनगरी मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांच्यामुळे. याचा अर्थ पूनमताईंनी या लावणीचा रिमेक बनविला किंवा स्वतः गायल्या असं अजिबात नाहीये. पण, ही लावणी त्या मनातल्या मनात नक्कीच गात असतील. घटनाच अशी घडली- ही लावणी आणि पूनमताईंसोबत घडलेली घटना अगदी तंतोतंत जुळतात. म्हणून ताईंच्या मनात ही लावणी रुंजी घालत असावी.
पूनमताई मुंबईच्या खासदार तर आहेतच. भाजप युवा आघाडीच्या अध्यक्षसुध्दा आहेत. यामुळं त्यांना सगळीकडं फिरावं लागतं. काश्‍मीर काय, कन्याकुमारी काय? सगळं सारखंच. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शहा यांनी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपविली आहे.

छत्तीसगडची राजधानी असलेल्यारायपूरमध्ये भाजयुमोचं खूप मोठ्ठं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. पूनमताई यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. व्यासपीठावर मुख्यमंत्री रमण सिंग बसले होते. शेजारी ताई बसल्या होत्या. अचानक, कुणाच्या तरी लक्षात आलं की, ताईंचा एक कान रिकामा आहे. पण दुसऱ्या कानात रिंग झुलते आहे. ही बाब ताईंच्या लक्षात आणून दिली गेली. बस्स! मग काय? आख्खं प्रशासन हादरलं. व्यासपीठावर शोधाशोध सुरू झाली. पदाधिकारी-कार्यकर्ते जमिनीवर रिंग शोधू लागले. छत्तीसगडची पोलीस यंत्रणा कामाला लागली. रायपूर विमानतळावर उतरल्यापासून ताई ज्या-ज्या ठिकाणी गेल्या त्या सर्व ठिकाणांवर सर्च ऑपरेशन सुरू झाले. सीसीटीव्हीचे फुटेज झूम करून बघितले जाऊ लागलेत. पूनमताई भाजप युवा आघाडीच्या अध्यक्षा. छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आणि शेजारी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री रमण सिंग. प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले नसते तरच नवल!

तरीपण, ताईंची रिंग काही सापडली नाही. रायपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत होत असतानाच रिंग कुठेतरी पडली असावी, असा दावा रायपूर पोलिसांनी केलाय. पोलिसांनुसार, हे प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलीस प्रत्येक बाजूचा तपास मोठ्या बारकाईने करीत आहेत. रिंग सोन्याची होती की आणखी कशाची होती हे पोलिसांना माहीत नाही. यामुळे रिंगचे नेमके मूल्य किती हेही पोलिसांना सांगता आले नाही. पण, भाजपशासित राज्यात भाजप युवा आघाडीच्या अध्यक्षांची रिंग बेपत्ता होणे मोठी गंभीर बाब आहे. दिल्ली हायकमांड आधीच रमन सिंग यांच्यावर नाराज आहे. अशात हे प्रकरण. दुष्काळात तेरावा महिना. परंतु, पूनमताईंनी आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. त्यांनी पत्रकार परिषद आणि युवा आघाडीच्या संमेलनाला एकच रिंग घालून संबोधित केले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काहीतरी हरविल्याची किंचितही जाणीव भाषणातून होऊ दिली नाही. कार्यक्रम उत्साहात पार पडला. यशस्वी झाला. आता, हरविलेली रिंग पुन्हा मिळणार की नाही? हे कुणालाही सांगता येत नाही. ताईलासुध्दा नाही. पण! रिंग हरविल्यामुळे 60 च्या दशकातील “बुगडी माझी सांडली गं जाता रायपूरला…’ ला हे गाणं म्हणण्याची पूनमताईंवर वेळ आली आहे.

– वंदना बर्वे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)