बीड : हिटरच्या उकळत्या पाण्यात होरपळून तीन मुलींचा दुदैवी मृत्यू

बीड : दोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. त्यामुळे हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून दुर्दैवी अंत झालाय. हि हृदयद्रावक घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्‍यातील भतानवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामीदेखील गंभीर भाजली असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.

दुर्गा बिभीषण घुगे (वय 10, रा. सोनपेठ, जि. परभणी), धनश्री पिंटू केदार (वय 8, रा. व्हट्टी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि आदिती संभुदेव भताने (वय 4) अशी या दुर्दैवी बलीकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघीजणी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अंबाजोगाई तालुक्‍यातील भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री दुर्गा, धनश्री, आदिती आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता या घरात झोपल्या होत्या तर इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसापासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटन तसेच चालू अवस्थेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरु झाले. त्यातील पाणी उकळून बाहेर आले. हे पाणी पडून हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचे गट्टू खचले आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या घटनेत चौघीही गंभीररित्या भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान या ठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मामी संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आदिती, दुर्गा, आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भतानवाडी परिसरावर शोककळा पसरलीये..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)