बीड जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असलेले 4 जण जेरबंद

बीड – अंबाजोगाई शहर पोलिसांनी पाठलाग करून घातक शस्त्रासत्रांसह दरोड्याच्या तयारीतील चौघांना जेरबंद केले तर अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. ही थरारक घटना आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास अंबाजोगाई लगतच्या रिंग रोडवर मानवलोक कार्यालयाच्या शेजारील पुलावर घडली.

अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई पोलिसांचे पथक नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना त्यांना एमएच 44 बी 2959 या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून काही इसम दरोड्याच्या तयारीने निघाले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गुप्त महितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील कर्मचारी भास्कर केंद्रे, सानप, आंबाड आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कुलकर्णी, गुंड, चाटे यांनी पाळत ठेवली. पहाटे तीन वाजताच्या दरम्यान, सदरील बोलेरो गाडी अंबाजोगाई लगतच्या रिंगरोडवरून जाताना आढळून आली. पोलिसांनी पाठलाग करून मानवलोक कार्यालयाशेजारील पुलावर बोलेरो समोर पोलीस गाडी लावून अडवले असता बोलेरो गाडीतील सहा संशयित पळून जाऊ लागले.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यापैकी प्रशांत सुरश शेप (रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई), बिभीषण महादेव चाटे (रा. साकुड ता. अंबाजोगाई), अशोक चंद्रसेन तोंडे (रा. सोनीमोहा ता. धारूर) आणि महादेव तुकाराम गडदे (रा. चिचखंडी ता. अंबाजोगाई) या चौघांना ताब्यात घेतले तर अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी पोलिसांनी बोलेरो गाडीची झडती घेतली असता त्यात तलवार, कोयते, सत्तूर, लोखंडी पाईप, चाकू, सुरी आदी घातक शस्त्रास्त्रे आणि मिरची पूड आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे ताब्यात घेतली असून पकडलेल्या आरोपींची सध्या कसून चौकशी सुरु आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत सुरश शेप, बिभीषण महादेव चाटे, अशोक चंद्रसेन तोंडे, महादेव तुकाराम गडदे आणि अन्य फरार दोघे असे एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आडके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)