बीटिंग द रिट्रीट एक अनुपम सोहळा

“अश्‍विनी, 29 तारखेला मी तुमच्याकडे येणार आहे बर कां. ” माझ्या मामाने मला फोनवर सांगितले. “” ये की, घर तुझेच आहे. आणि येणार म्हणून सांगायला कशाला पाहिजे. आम्ही काही कुठे बाहेर जात नाही. तुझी तर वाटच पाहत असतो आम्ही सगळे, आणि ओंकार तर अगदी जास्तच आवडीने. मामाआजोबा आलेले त्याला फार आवडतात.” मी उत्साहाने म्हटले.

“तसे नाही ग,” मामा म्हणाला, “29 तारखेला संध्याकाळी मी चांगला चारपाच तास बसायला येणार आहे तुझ्याकडे.” मामा म्हणाला, “” आनंदच आहे. ” मी म्हटले. ” हे म्हणजे अगदी “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असा प्रकार झाला. मुक्कामालाच ये.” मी म्हटले. ” पण विशेष काय आहे 29 तारखेला ? आमचा कोणाचा वाढदिवस नाही, आणि तुझाही नाही. मग सांगून आणि ते ही 4-5 तासासाठी यावे असे काय विशेष आहे? ” मी विचारले.

“बीटिंग द रिट्रीट’ त्याने उत्तर दिले. माझ्या डोक़्यात लख्ख प्रकाश पडला. बीटिंग द रिट्रीट हा आमचा सर्वांचा एक अत्यंत आवडता कार्यक्रम. तसे आमच्या घरात कोणालाच टीव्हीचे व्यसन नाही. सगळेजण अगदी मोजकेच कार्यक्रम बघणारे. पण जे काही बघतो, ते आवडीने बघतो आणि त्याचा आनंद पुरेपूर लुटतो. बीटिंग द रिट्रीट हा असाच वर्षातून एकदा होणारा कार्यक्रम. अत्यंत श्रवणीय आणि त्याहून अधिक प्रेक्षणीय . 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर तिसऱ्या दिवशी का कार्यक्रम होतो.

बीटिंग द रिट्रीट. पायदळ, हवाई दळ आणि नौदल अशा तीनही दळांचे बॅंड यात भाग घेतात. तीनही बॅंड्‌सचे वादन श्रवणीय तर असतेच;;आणि शिवाय त्यांची वाद्ये, त्यांचे पोषाख, त्यांचे संचलन आणि बॅंडच्या कंडक्‍टरचे इशारे हे सारे सारे अत्यंत प्रेक्षणीय असते. बॅंड मास्टरच्या केवळ इशाऱ्यावर वादन करणे, मार्चिंग करणे मार्चिंग करताना वेगवेगळी डिझाईन्स करणे हे सारे प्रेक्षणीयही असते. आणि कंडक्‍ट, म्हणजे बॅंडमास्टरच्या हालचाली, त्याचे इशारे पाहण्यात तर मोठा आनंद असतो.

गेली कित्येक वर्षे आम्ही तो कार्यक्रम अगदी न चुकता बघतो.पूर्वी तर माझा भाऊ त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ठेवायचा. अजूनही त्याच्या संग्रही काही रेकॉर्डिंग असतीलच. पण आता मात्र तसे काही करण्याची आवश्‍यकताच भासत नाही. कारण नेटवर सारे काही उपलब्ध असते. कधीही, कोठेही. मोठी जादूची कांडी आहे, हे नेट.
मुळात ल्ष्कराबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. त्यांचे ते पोषाख, कडक शिस्त, शस्त्रे, प्राणांची बाजी लावण्याची जिद्द हे सारे अंतर्मनात कुठेतरी जागा करून असते. त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकाव्या-वाचाव्याशा वाटतात. मात्र लष्कराच्या बॅंडबद्दल फारशी कोणाला माहिती नसते. त्यासाठी बीटिंग द रिट्रीत हा कार्यक्रम अवश्‍य पाहावा-ऐकावा.

बीटिंग द रिट्रीट हा 4 दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यचा समाप्तीचा कार्यक्रम असतो. दिल्लीतील रायसिना हिल्सच्या विजय चौकात बीटिंग द रिट्रीट समारंभाचे आयोजन दर वर्षी केले जाते. 26 जानेवारापासूनच राष्ट्रपती भवन आणि सर्व सरकारी इमारतींवर दिमाखदार रोषणाई केलेली असते. या समारंभाचे मुख्य अतिथी असतात राष्ट्रपती. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही उपस्थित असते .

1950 पासून आतापर्यंत बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम फक्त दोन वेळा रद्द करण्यात आलेला आहे. 2001 साली गुजरातमध्ये बूकंप झाला तेव्हा आणि 2009 साली भारताचे राष्ट्रपती वेंकटरमन यांचा दीर्घकाळच्या आजारपणानंतर मृत्यू झाला तेव्हा. बीटिंग द रिट्रीटमध्ये भारतीय लष्कराचे पायदळ , हवाईदळ आणि नौदलाचे बॅंड सहभागी होत आले आहेत. आता बीएसएफ, आयटीबीपी अर्धसैनिक दले आदींचाही समावेश झालेला आहे. बॅंड वादनात कदम कदम बढाये जा, जय भारती, ताकत वतन की हमसे है, नन्हा मुन्हा राही हूं, आदी प्रसिद्ध मार्चिंग धून वाजवल्या जातातच, शिवाय नवनवीन लोकप्रिय गाणीही वाजवली जातात.

इतर वाद्यांशिवाय केवळ ड्रमर्सचेही वादन असते, ते ही अत्यंत श्रवणीय आणि प्रेक्ष्णीय असते. नुसते ड्रम्स वाजतात ही कल्पनाच कशी वेगळी वाटते. पण त्यातही खूप व्हरायटी, कल्पकता असते. बीटिंग द रिट्रीटच्य शेवटी मुख्य बॅंडमास्टर राष्ट्रपर्तींकडे जाऊन बॅंड परत नेण्याची अनुमती मागतात, तेव्हा कार्यक्रम संपल्याची सूचना मिळते. सारे जहांसे अच्छा हिंदुस्तां हमारा या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप होतो. आता 29 तारखेला संध्याकाळी या वर्षीचे बीटिंग द रिट्रीट पाहण्या-ऐकण्याची ओढ लागून राहिलेली आहे. तुम्हीही अवश्‍य बघा !

अश्विनी महामुनी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)