‘बीटकॉईन’पासून सावधान!

2017 मध्ये भारतात बीटकॉईनचा सर्वाधिक बोलबाला झाला आणि अनेकांनी त्याची खरेदी केली. भारतीय गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी या चलनाकडे वळण्याचा मोह टाळला पाहिजे, असा सल्ला अर्थसार’ पुरवणीत वेळोवेळी देण्यात आला. आता बीटकॉईनमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले असून सरकारनेही बॅंकांतून बीटकॉईन खरेदीवर मज्जाव केला आहे, या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर 2017 चा हा लेख..

जितक्‍या किंमतीच्या नोटा छापल्या जातात, तेवढे सोने रिझर्व बॅंकेत (सेन्ट्रल बॅंक) ठेवले जाते, असा अनेकांचा समज आहे. पण ही पद्धत केंव्हाच बंद झाली असून आता जगात कोठेच सोने ठेवून नोटा छापल्या जात नाहीत. नोटा किती छापायच्या याची काही गणिते आज केली जात असली तरी सरकारकडे पुरेसा महसूल जमा होत नसला तर नोटा छापण्याची पद्धत रूढ झाली आणि त्यामुळे चलनाचे महत्व कमी होऊ लागले.

बीटकॉईनसारख्या डिजिटल चलनाची निर्मिती त्यातून झाली असून जगात या चलनाविषयी आज प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. सात वर्षे पूर्ण झालेली बीटकॉईनची गुंतवणूक प्रचंड परतावा देते, हे कळल्यानंतर भारतातील अनेक गुंतवणूकदारांनी त्यात उडी घेतली आहे. त्यात जपान सरकारने बीटकॉईनला मान्यता दिल्याने त्याची जगात अधिकच चर्चा होऊ लागली होती. पण चीन सरकारने बीटकॉईनच्या एक्‍स्चेंजवर बंदी घातल्याने तसेच भारताच्या रिझर्व बॅंकेने बीटकॉईनविषयी शंका उपस्थित केल्याने गेल्या काही दिवसांत त्याच्या किंमती 40 टक्के कोसळल्या आणि आता पुन्हा वाढू लागल्या आहेत.

-Ads-

जेपी मोर्गनचे सीइओ जॅमी डायमॉन यांनी तर बीटकॉईनला फ्रॉड’ म्हटले आहे. अशा परिस्थितीत आपण त्यात गुंतवणूक करावी काय, असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांच्यासाठी हा सावधानतेचा इशारा आहे. बीटकॉईन हे डिजिटल चलन असून त्याला क्रॅपटोकरन्सी म्हणतात. अशा किमान 800 करन्सीचा जन्म जगात झाला असून सरकारी करन्सी आणि करांपासून वाचण्यासाठी या करन्सी वापरल्या जात आहेत. या करन्सीवर कोणाचा ताबा आहे, हे कोणीच सांगू शकत नाही.

ज्या करन्सीवर कर घेतला जातो, ती सरकारने जारी करन्सी वापरण्याची पद्धत या डिजिटल करन्सीमुळे रूढ होत आहे. अर्थात या करन्सीच्या देवघेवीविषयी काही वाद झाला तर त्याविषयीची दाद कोठे मागायची, हे प्रश्न आज अनुत्तरीत आहे. तरीही भारतासह जगभर हे चलन वेगाने खरेदी केले जात असून त्यावर काही जण अव्वा की सव्वा परतावा मिळवत आहेत.

एका बीटकॉईनची गेल्या 2 सप्टेंबरला तीन लाख 16 हजार किंमत होती, ती 15 सप्टेंबरला एक लाख 88 हजार इतकी खाली आली होती. म्हणजे पंधरा दिवसांत 40 टक्के ! पण असे होण्याची ही पहिली वेळ नाही. जुलै 2010 पासून आलेल्या बीटकॉईनने असे हेलकावे अनेकदा खाल्ले आहेत. याचा अर्थ बीटकॉईन हे अशाच गुंतवणूकदारांसाठी आहे, ज्यांना या टोकाच्या हेलकाव्यांची सवय आहे किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा पडला आहे, त्यांना धाडस म्हणून काही करायचे आहे.

दुसरा तेवढाच महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व इंटरनेटवर होणार आहे. त्यासाठी विशिष्ट साईटवर जाणे, त्यासाठीचे पासवर्ड लक्षात ठेवणे (ते विसरले तर पैसे गेले, याची मानसिक तयारी करणे) आणि असे डिजिटल पेमेंट जेथे चालते, तेथेच व्यवहार करणे, या सर्व गोष्टी ओघाने आल्याच. त्यामुळे या व्यवहारात प्रवेश करताना चार वेळा विचार केला पाहिजे.

सोन्याची किंमत जशी जग अस्थिर झाल्यावर वाढते, तसेच बीटकॉईनचे आहे. जगातील आर्थिक व्यवहारांची विश्वासार्हता सरकारी नियंत्रणे असलेल्या यंत्रणानी कमी केली असल्याने अशा चलनावर लोक विश्वास ठेवू लागले आहेत. पण या चलनातून सरकारला कर घेता येत नाही, म्हणून सर्व सरकारे एकत्र येवून बीटकॉईनच्या विरोधात उभे राहिले तर या चलनाची किंमत एकदम खाली येवू शकते. अजून बीटकॉईनचा प्रसार मर्यादित असल्याने त्याच्या किंमती वाढत जातील, पण त्यात काही विवाद उभा राहिला तर गुंतवणूकदारांना मोठ्या धक्क्‌याला सामोरे जावे लागेल.

ताजा कलम – बिटकॉईनचे व्यवहार आणखी तीन महिन्यानी भारतात बॅंकेतून होणार नाहीत, असा आदेश रिझर्व बॅंकेने अलीकडेच काढल्याने बिटकॉईन चलनाच्या भवितव्याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ज्यांना या व्यवहारातून बाहेर पडायचे आहे, त्यांना अजूनही संधी आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)