• महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात: मेट्रो धावण्याच्या तयारीत; पण, बीआरटीची दूरवस्था

पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग लवकरच सुरु करणार, अशा वल्गना कित्येकदा केल्यानंतरही या मार्गावर बीआरटी सुरु झाली नाही. दुसरीकडे मेट्रोचे काम मात्र मेट्रोच्याच गतीने सुरु आहे. कानामागून येऊन तिखट झालेल्या मेट्रोने आपल्या कामासाठी बीआरटी मार्गाचे कॅरिडोर उखडून टाकले आहेत. पिंपरी चौकात खराळवाडी येथे मेट्रोसाठी बीआरटी कॅरिडॉर उखडून टाकण्यात आले आहेत.

पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन बीआरटी मार्ग बनवला. या मार्गावर बीआरटी धावलीच नाही आणि धूळखात या मार्गाची व बस स्थानकांची दूरवस्था झाली. पुन्हा पालिकेने मोठी रक्‍कम खर्चून या मार्गाची आणि बसस्थानकांची दुरुस्ती करुन घेतली. बीआरटी सुरु झालीच नाही आणि महामेट्रोने तात्पुरते तरी पालिकेचे बीआरटी स्वप्न चिरडत कॅरीडोर उखडून टाकले आहेत.

दापोडीपासून निगडीपर्यंत स्वतंत्र बीआरटी कॅरीडोर सुमारे सहा वर्षांपासून तयार आहेत. हा बीआरटी मार्ग म्हणजे केवळ प्रशस्त रस्ता लहान करुन वाहतूक कोंडीचे कारण बनला आहे. कॅरीडोर झाल्यापासून वाहतुकीवर परिणाम होत असून वाहनचालक व नागरिकांनी कायमच बीआरटीच्या मार्गालाच दूषणे दिली. ग्रेड सेपरेटरमुळे बीआरटीसाठी किचकट ठरणा-या याच मार्गावर सर्वप्रथम बीआरटी बससेवा सुरू होणार होती. नागरिकांचा विरोध व सुरक्षेच्या कारणास्तव ही बीआरटी सुरू होऊ शकलीच नाही. तीव्र विरोधामुळे हे प्रकरण थेट आता न्यायालयात जाऊन पोहचले. यामुळे बीआरटी आता केवळ जागा अडवून वाहतूक कोंडी करणारी बाब ठरत आहे.

…एवढा पैसा पाण्यात
पिंपरी चिंचवड सर्वात आधी निगडी-दापोडी बीआरटी मार्ग तयार करण्यात आला. भल्या मोठ्या मार्गावर कॅरीडोर टाकून बीआरटीचा मार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर तयार झालेल्या सांगवी ते किवळे व नाशिकफाटा ते वाकड या मार्गांवर बीआरटी धावू देखील लागली. मात्र, अनेकवेळा मुहूर्त काढून देखील या मार्गावर बीआरटी सुरू होऊ शकली नाही. सद्यस्थितीत या मार्गावर बीआरटी कॅरीडोर व 36 बसस्टॉप तयार आहेत. त्यापैकी काही बसथांब्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्या बसथांब्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी, तर सुरक्षा उपायांसाठी महापालिकेने नुकताच मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, मेट्रोच्या कामासाठी आता खराळवाडी येथे बीआरटी कॅरीडोर उखडून टाकण्यात आले आहेत.

ताळमेळाचा अभाव…
अगदी काही दिवसांपूर्वी पालिकेने सिग्नल व कॅरीडोरचे काम केले होते. पालिकेला माहीत होते की मेट्रो आपले काम करत-करत येथे येणार. मेट्राचे एक स्थानकही खराळवाडी येथे असणार आहे. परंतु, याचा विशेष विचार न करता दुरुस्तीसाठी पालिकेने पैसा पाण्यात घातला. केवळ मेट्रोच्या आधी आम्ही बीआरटी बस सुरु करु या अपेक्षेने केलेल्या नियोजनशून्य कामामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झालेला दिसत आहे. त्यामुळे महापालिका व मेट्रो कंपनी यांच्यात बीआरटी व मेट्रोच्या कामाबाबत ताळमेळ नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. तर, दुसरीकडे या मार्गावर बीआरटी कॅरिडॉर, निगडीतील बीआरटी टर्मिनल, बसथांबे उभारणे, त्यांची दुरस्ती, सिग्नल यंत्रणा आणि इतर कारणांसाठी महापालिका सातत्याने कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे या प्रकारे बीआरटीवर पालिका करत असलेला खर्च व्यर्थ तर जाणार नाही ना अशी भीती आता निर्माण होऊ लागली आहे.

तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार
केंद्रापासून पालिकेपर्यंत भाजपची सत्ता आहे. मेट्रो हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मेट्रोमुळे पालिकेच्या बीआरटीची अगदी सुरवातीपासूनच फरफट होताना दिसत आहे. परंतु मेट्रोसाठी केंद्र व राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा पाहता पालिकेतील पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना काही बोलता येणे शक्‍य नाही. अर्थात पालिकेच्या बीआरटीची अवस्था सध्या “तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार’ अशीच झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)