बीआरटीएस थांब्यांच्या दरवाजात आढळल्या त्रुटी

नयना गुंडेच्या यांनी केलेल्या प्रवासादरम्यान आला अनुभव

पुणे- राज्यकर्त्यांच्या हट्टापायी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुरू करण्यात आलेल्या “बीआरटीएस’ मार्गात त्रुटी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अत्याधुनिक बसथांब्यावर बस थांबल्यानंतर अथवा निघून गेल्यानंतर थांब्याचा दरवाजा उघडाच राहात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे थांब्यावरील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, “पीएमपीएमएल’च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनाच पीएमपी बस प्रवासादरम्यान हा अनुभव आला असून या यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुलीच खुद्द गुंडे यांनी दिली आहे.

बीआरटीएस मार्गावर प्रवास करताना काही त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. त्यानुसार संबंधीत अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद गतीने व्हावा, यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. – नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल

सुखकर प्रवास आणि प्रवासाला “गती’ यावी या उद्देशाने अहमदाबादच्या धर्तीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी “बीआरटीएस’ मार्ग सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासन आणि दोन्ही महापालिकांनी घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते हडपसर आणि त्यानंतर स्वारगेट ते कात्रज या मार्गावर “बीआरटीएस’ मार्ग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र, या मार्गातच मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याने हा प्रयोग अपयशी ठरला होता.

त्याशिवाय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक वाहनचालकांना जीव गमवावा लागला होता, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. हा अनुभव ताजा असताना प्रशासनाने पुन्हा एकदा विश्रांतवाडी आणि नगर रस्त्यावर “बीआरटीएस’ मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गावरही प्रशासन आणि प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. याबाबत प्रवाशांनी अतक्रारी केल्यानंतर त्रुटी दूर करण्यात आल्या.

या त्रुटी दूर केल्यानंतर सर्व काही आलबेल आहे असे वाटत असतानाच आता मार्गावर नव्हे तर बसथांब्यावरच अनेक अडथळे असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनाच प्रवासादरम्यान या त्रुटी निदर्शनास आल्या आहेत.

पीएमपीएमएलचा पदभार हाती घेतल्यानंतर दीड महिन्यांच्या कालखंडानंतर गुंडे यांनी बसमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी अचानक प्रवासाची आपली संकल्पना जाहीर केली. हा प्रवास करत असताना त्यांनी बीआरटीएस मार्गांची पाहाणी केली. तसेच बसथांबे आणि अन्य यंत्रणेची पाहणी केली. त्यावेळी बसथांब्यावरील दरवाजे उघडण्यात आणि पुन्हा ते बंद होण्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात येताच गुंडे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार या त्रुटी दूर करण्याचे आणि बीआरटीएस मार्ग तसेच बसथांब्यावरील पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे आदेश गुंडे यांनी पीएमपीएमएलचे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

बीआरटीएस मार्गातील घुसखोरी कोण रोखणार ?
बीआरटीएस मार्गावर रुग्णवाहिका वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, हे वास्तव असतानाच एसटी महामंडळाच्या बसेससह अनेक खासगी वाहने या मार्गावर घुसखोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातूनच या मार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याची जाणीव असतानाही ही घुसखोरी रोखण्यासाठी आतापर्यंत प्रभावी प्रयत्न झालेले नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)