बिहारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांमधील दरी रूंदावली?

कुशवाहांच्या कार्यक्रमाला राजद नेत्यांची उपस्थिती
पाटणा – केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (रालोसप) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आयोजित केलेल्या मानवी साखळीत चक्क राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते सहभागी झाले. त्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या घटक पक्षांमधील दरी आणखी रूंदावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसभेत तीन सदस्य असणारा रालोसप एनडीएचा घटक आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेच्या जागृतीसाठी कुशवाह यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मानवी साखळीत भाजप आणि जेडीयू या पक्षांचे नेते उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्या पक्षांचे नेते मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी फिरकले नाहीत. याउलट, लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदचे नेते मानवी साखळीत सहभागी झाले. या घडामोडीवरून कॉंग्रेसने एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची प्रतिक्रिया दिली. एनडीएमध्ये कुशवाह यांची घुसमट होत असल्याचे राजदचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी याआधी म्हटले होते.

त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कॉंग्रेसने म्हटले. अर्थात, एनडीएमध्ये कुठला बेबनाव असल्याचे स्वत: कुशवाह यांनी नाकारले. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू एनडीएत सहभागी झाल्यापासून ते नाराज असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)