बिहारमधील सत्ताबदलानंतर मोदी-नितीश यांची प्रथमच भेट

नवी दिल्ली -बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. बिहारमधील सत्ताबदलानंतर नितीश यांनी प्रथमच त्यांची भेट घेतली.

नितीश यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने बिहारमधील जेडीयू, राजद, कॉंग्रेस महाआघाडीची सत्ता गेली. त्यानंतर त्या राज्यात सरकार स्थापनेसाठी जेडीयू आणि भाजप एकत्र आले. आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारमध्ये जेडीयू सहभागी होण्याची शक्‍यता आहे. यापार्श्‍वभूमीवर, बिहारमधील सत्ताबदलानंतर नितीश प्रथमच देशाच्या राजधानीत दाखल झाले. मोदी यांच्या भेटीनंतर ती सदिच्छा स्वरूपाची असल्याचे नितीश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मोदी यांच्यापाठोपाठ नितीश यांनी शहांचीही भेट घेतली.

त्यांच्यात बिहारमधील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. जेडीयूचे संसदेत 12 सदस्य आहेत. त्यात लोकसभेच्या 2 आणि राज्यसभेच्या 10 खासदारांचा समावेश आहे. पाटण्यात 19 ऑगस्टला जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळातील सहभागाबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. जेडीयूला केंद्रात किती मंत्रिपदे मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)