शासकीय निधी नसताना ग्रामस्थांचा पुढाकार
उरुळी कांचन – बिवरी (ता. हवेली) येथील मुळा- मुठा नदीवर लोकसहभागातून बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यास शासकीय योजनेचा निधी नसतानाही सामाजिक बांधिलकीतून महालक्ष्मी डेव्हलपर्सचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गोते व मित्रपरिवारांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून स्वखर्चातून बनविण्यात आला आहे. यावर्षी या दोन गावांतील ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. नागरिकांनी बंधारा उभारण्यासाठी विशेष सहभाग नोंदवला.
बिवरी ते नायगाव- कुंजीरवाडीमार्गे पुणे- सोलापूर रोडकडे वाहनचालकास सहजपणे जाता येते. बिवरी येथील नागरिकांना कोरेगावमूळवरील बंधाऱ्यावरून उरुळी कांचनमार्गे सोलापूर रोडकडे यावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि अंतर जादा होते. तसेच यासाठी वळसा मारून यावे लागत होते. त्यामुळे हा मार्ग खडतर आणि त्रासदायक बनला होता. नायगाव बिवरी मुळा- मुठा नदीच्या सीमेवर बंधारा तयार केल्याने वाडेबोल्हाईवरून नगररोडकडे जाण्यास हा मार्ग सोयीस्कर आहे. बिवरी, वाडेबोल्हाई परिसरातील नागरिकांना सोलापूर रस्त्याला नायगावमार्गे सोयीस्कर आहे. हा बंधारा आठ महिने वाहतुकीस मोकळा आहे. मुळा- मुठा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास बंधाऱ्याच्या काही भाग वाहून जातो. गेली चार वर्षे बिवरी येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य तसेच लोकसहभागातून व दत्तात्रय गोते मित्रपरिवार यांच्या माध्यमातून बंधाऱ्यासाठी खर्च केला जात आहे. या दोन्ही गावांच्या समिेवर तरुणांनी एकत्र येत बंधारा बांधला. या बंधाऱ्यास शासकीय मान्यता मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शिरुर -हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे सरपंच-उपसरपंच यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार पाचर्णे यांचाही शासनाच्यास्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. या बंधाऱ्यास शासकीय मान्यता मिळून कायमस्वरुपी या दोन्ही गावांच्या नदीवर बंधारा बांधावा, अशी मागणी होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा