बिर्ला रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल

पिंपरी – उपचाराचे बील भरले नाही म्हणून रुग्णाला 12 दिवसांपासून डांबून ठेवल्याप्रकरणी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा दुबे व रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय दशरथ आरडे (वय-38, रा. पिंपरी कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आरडे यांचे वडील दशरथ शिवाजी आरडे (वय-72) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना 8 ऑगस्ट रोजी आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र 11 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिला. त्यावेळी त्यांना तीन दिवसांच्या उपचारासाठी 86 हजार 586 रुपयांचे बील देण्यात आले. संजय आरडे यांनी आम्ही दारिद्रय रेषेखालील नागरिक असून बीलाच्या रकमेत सुट मिळावी अशी मागणी केली. त्यासाठी रुग्णालयाकडे कागदपत्रेही सादर केली होती. मात्र, तरीही रेखा दुबे व राजेश दुबे यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना रुग्णालयातून सोडण्यास नकार दिला दिला. त्यांना इतरांना भेटण्यास मनाई केली. त्यांना डांबून ठेवत उपाशीही ठेवण्यात आल्याचा आरोप संजय आरडे यांनी केला आहे.

याच बरोबर त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, याप्रकरणी पुणे जिल्ह्याचे धर्मादाय आयुक्तालयाला पत्र ही देण्यात आले होते. त्यानुसार सह धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी रेखा दुबे यांना फोनवरुन संपर्कही साधला होता. मात्र तरीही त्यांनी दशरथ आरडे यांना अद्याप सोडलेले नाही. अखेर आरडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, रेखा दुबे यांच्या विरोधात इच्छेविरोधात अडवून ठेवणे व सुरक्षा रक्षकाद्वारे नातेवाईकांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रेखा दुबे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी, “”आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आपण या विषयावर बोलणार नाही” असे सांगत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
यापूर्वीही आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. धर्मादाय आयुक्‍तांनीही अनेकदा समज देवूनही रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना कोणतीही दाद दिली जात नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या वाढत्या मनमानीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

दशरथ आरडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना बिर्ला रुग्णालयात दाखल करते वेळी दहा हजार रुपये भरले. तसेच रुग्णालयाने त्यांना औषधे बाहेरून आणण्यास लावले. त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत. दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. कागदपत्र देवूनही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत. उपचाराचा खर्च देण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे रुग्णालयाने त्यांना अद्याप सोडले नाही. याविरोधात नातेवाईकांसह आपण धरणे आंदोलन देखील केले. मात्र, रुग्णालय प्रशासन दाद देत नाही. रुग्णालय व्यवस्थापनावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करावा.
– अजिज शेख, सामाजिक कार्यकर्ता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)