बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रा उत्साहात

फलटणला भंडाऱ्याची उधळण : हजारो भाविकांची उपस्थिती

फलटण, दि. 29 (प्रतिनिधी) – “बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’, “विठ्ठलाच्या नावानं चांगभल” “काशिलिंगच्या नांवान चांगभलंऽऽऽ’चा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करत जाधववाडी, फलटण (ता. फलटण) येथील श्रीबिरोबाची तीन दिवसाची यात्रा पुजारी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यात्रेचा दि. 28 रोजी मुख्य दिवस होता. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेत दाखल झाले होते. ढोल, पिपाणी व डफड्याच्या निनादात भाविक दंग होऊन भंडाराची उधळण करत यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
फलटण येथील अहिल्यानगर येथील चोरमले परिवाराकडे जाधववाडी येथील बिरोबाच्या मंदिराची दैनंदिन पूजेचा मान असून वर्षभर सर्व उत्सव व कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. दि. 26, 27 व 28 या तीन दिवसांत या वर्षाची यात्रा पार पडली. पहिल्या दिवशी सायंकाळी पारंपरिक वाद्य ढोल, डफडी, पिपाणी सनई या वाद्याच्या गजरात वाजत गाजत देवाच्या मानाच्या वेताच्या कावडकाठ्या घोडा पालखीसह जाधववाडी येथील बिरोबाच्या मंदिरात पायी वाजत-गाजत चोरमले बांधव आणतात. यानंतर याठिकाणी असणाऱ्या सर्व मंदिराची पूजाअर्चा करून पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून नैवेद्य दाखवून यात्रेस सुरवात होते. दुसऱ्या दिवशी सर्व मंदिराची साफसफाई करून श्री बिरोबा देवाची पारंपरिक पद्धतीने दागिने व पोशाख घालून पूजा बांधली जाते तसेच मंदिराची विविध फुलाच्या सहाय्याने आकर्षक सजावट केली जाते. दुसऱ्या दिवशी रात्री सर्व चोरमले परिवार मंदिराच्या परिसरात कुटुंबासमवेत यात्रेस रात्रीच्या बारा वाजता जमतो रात्रीच्यावेळी ढोल, पिपाणी व डफड्याच्या गजरात गंजीनृत्य करतात. रात्री एक वाजता पुजारी भाकणूक सांगतात. ही भाकणूक ऐकण्यासाठी हजारो धनगर बांधव मंदिर परिसरात आलेले असतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा हिच भाकणूक दुपारी बारा वाजता होते. धनगर समाजाचे पारंपारीक गजीनृत्ये, धनगरी ओव्या, बिरोबा देवाचे वाण ऐकवले गायले जाते. बिरोबा देवास पूजाअर्चा करून पारंपरिक पद्धतीने नैवद्य केला जातो. या दिवशी दिवसभर मंदिरात धनगरी ओव्या तसेच गजीनृत्य पाहाण्यास हजारोंच्या संख्येने भक्तगण हजर राहतात. सायंकाळी सर्व मंदिराची साफसफाई करून पाकाळणी केली जाते व पूजाअर्चा केली जाते. मानाच्या वेताच्या काठ्या घोडा पालखीसह पारंपरिक वाद्य ढोल, डफडी व पिपाणीच्या गजरात वाजत गाजत घरी आणल्या जातात व या यात्रेची सांगता होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदू – मुस्लिम ऐक्‍याचे प्रतिक

फलटण जाधववाडी येथील बिरदेव देवस्थान प्राचीन देवस्थान असून हे देवस्थान हिंदू – मुस्लिम ऐक्‍याचे प्रतिक मानले जाते. याठिकाणी विठ्ठल-रुक्‍मिणी, शंभू महादेव, तुळजाभवानी आईसह पिरसाहेब दर्गा दावणमलिक, खातगुणचे पिरसाहेब दर्गा असून बिरोबासह पिरसाहेब महाराज यांना यात्रेत व इतर वेळी बरोबरीने मान दिला जातो. असंख्य हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र उत्सवात सहभागी होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)