“बिम्स्टेक’ सदस्यांचा “मिलेक्‍स’ लष्करी सराव

पुणे – “बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्‍टरल टेक्‍निकल अॅण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन'(बिम्स्टेक) सदस्य राष्ट्रांच्या “मिलेक्‍स’ या पहिल्या संयुक्त लष्करी सरावाचा सोमवारी औपचारिक संचलनाद्वारे प्रारंभ झाला. लष्कराच्या गोल्डन कतार तुकडीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा झाला. सदस्य राष्ट्रांच्या लष्करी तुकड्यांचा सहभाग असलेल्या संचलनाचे नेतृत्व गोरखा बटालियनच्या कॅप्टन गौरव शर्मा यांनी केले.

लष्करी सरावाचे औंध येथील लष्करी ठाणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या सरावाचा 16 सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे. याप्रसंगी सर्व सहभागी राष्ट्रांचे लष्करप्रमुख, भारताचे लषकरप्रमुख जनरल बिपीन रावत आणि रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित राहतील.

याप्रसंगी मेजर जनरल शर्मा म्हणाले, “दहशतवाद ही समस्या केवळ एका राष्ट्रापुरती राहिली नसून जगातील बहुतांश देशांना त्याचा सामना करण्याचा प्रश्‍न भेडसावतोय. या समस्येशी लढण्यासाठी दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारचा संयुक्त सराव हे सैन्यातील परस्पर सामंजस्य आणि युद्धकौशल्य वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, असा विश्‍वास मला वाटतो.

या लष्करी सरावात भूटान, बांग्लादेश, म्यानमार, भारत आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचा सहभाग आहे. थायलंडतर्फे एक निरीक्षक तुकडी यामध्ये सहभागी होणार आहे. ही तुकडी प्रत्यक्ष युद्धसराव न करता केवळ निरीक्षक म्हणून काम पाहिल. प्रत्येक देशाचे 25 जवान आणि पाच लष्करी अधिकारी असे एकूण तीस जण या तुकडीत समाविष्ट आहेत.

“नेपाळ’ची माघार
“बिम्स्टेक’ची स्थापना करताना लष्करी सरावाबाबत कोणताही करार झाला नव्हता, त्यामुळे हा लष्करी सराव संघटनेच्या कराराशी सुसंगत नसल्याचे कारण सांगत नेपाळने सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे नेपाळतर्फेही केवळ निरीक्षक तुकडी सहभागी होणार आहे. नेपाळच्या या भूमिकेमागे चीनकडून होणारा दबाव हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे विविध प्रसारमाध्यमांच्या अहवालातून सांगण्यात आले.

लष्करी बॅन्ड आणि हेलिकॉप्टरद्वारे सलामी
लष्कराच्या महार रेजीमेंटच्या बॅण्डपथकाद्वारे सादर केलेल्या “कदम कदम बढाए जा’ या गाण्यांच्या चालीवर जवानांकडून संचलन करण्यात आले. तसेच, बिम्स्टेक संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचे राष्ट्रध्वजांना चिता या हेलिकॉप्टरच्या फ्लाइंग पासच्या माध्यमातून सलामी देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)