बिबट्या निवारा केंद्र “ओव्हर फ्लो’

संग्रहित छायाचित्र

वाढत्या संख्येचा केंद्रावर ताण : ठेवायचे कुठे याची चिंता


मर्यादित संख्या लक्षात घेऊन केले होते विकसित

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – मानवी हल्ल्यामुळे, रस्ता ओलांडताना गाडीची धडक बसल्यामुळे अथवा अन्य काही कारणास्तव जखमी झालेल्या बिबट्या आणि त्याच्या बछड्यांच्या पुनर्वसनासाठी वनविभाग आणि एसओएस वाइल्ड लाइफ या संस्थेतर्फे बिबटा निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, मर्यादित संख्या लक्षात घेऊन विकसित केलेल्या या केंद्रात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुणे विभागातील बिबट्या निवारा केंद्र हे ओव्हर फ्लो झाले असून, केंद्रातील वाढत्या बिबट्यांच्या व्यवस्थेचा केंद्रावर ताण पडत असल्याने, त्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्‍न वन विभागसमोर निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर पट्ट्यात गेल्या तीस वर्षांपासून बिबट्या वास्तव्यास आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत आंबेगाव, खेड भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. एवढेच नव्हे; तर पूर्वी कधीही न दिसलेल्या शिरूर, इंदापूर, बारामतीमध्ये देखील बिबट्याने नागरिकांना दर्शन दिल्याच्या घटना पुढे येत आहेत. उसाच्या शेती सारखे राहण्याचे सुरक्षित ठिकाण आणि सहजपणे उपलब्ध होणारे भटकी कुत्री, डुक्कर आणि इतर जनावरांसारखे “इझी फूड’ यामुळे या परिसरात बिबट्यांचा वावर वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर याठिकाणी मानव-बिबट्या संघर्ष, अपघात, अशा दुर्घटना होऊन जखमी झालेल्या बिबट्यांचे प्रमाणही वाढत आहे. अशा बिबट्यांना जुन्नर येथील मानिक डोह बिबटा निवारा केंद्र तसेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे आश्रयात ठेवण्यात येते. सध्या माणिक डोह येथे सुमारे 32 बिबट्या आहेत. यापैकी 10 नर आणि इतर मादी बिबटे आहेत. मात्र, ही संख्या केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक असून, त्यामुळे केंद्रावर पुनर्वसनाचा भार पडत आहे. यासंदर्भात नेमके काय करावे, असा प्रश्‍न वनविभागाला पडला आहे.

निवारा केंद्रात प्रामुख्याने चार प्रकारचे बिबटे असतात. यामध्ये अनाथ, अपंग, दीर्घ काळासाठी कैद केलेले आणि मिश्र स्वरुपाचे अशा बिबट्यांचा समावेश आहे. बिबट्यांचा वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार शेड्यूल्ड वन म्हणजेच संरक्षणास पात्र असलेल्या प्राण्यांमध्ये समावेश होतो. त्यामुळे अनेकदा या बिबट्यांना जंगलात परत सोडणे शक्‍य नसते. परंतु केंद्राच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने बिबट्या येथे वास्तव्यास असल्याने त्यांची व्यवस्था ठेवण्याचा ताण संस्थेवर पडत आहे. –

– डॉ. अजय देशमुख, माणिक डोह बिबट्या निवारा केंद्र


बिबट्यांची संख्या वाढल्याने केंद्रावर पडणाऱ्या ताणाची जाणीव वनविभागाला आहे. याबाबत विभागाकडून विचार केला जात असून, लवकरच यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईन.

– महेश भावसार, सहायक उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)