बिबट्याने रात्री केली शिकार, पहाटे पडला विहिरीत

कालवडे येथील घटना, दुपारी ठोकली धूम
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) – गुरूवारी रात्री शेळीचा फडशा पाडल्यानंतर पहाटे भक्ष्याचा पाठलाग करताना कालवडे (ता. कराड) येथील शेतातील बांधीव, पायर्‍या नसलेल्या आणि पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने लोखंडी अँगलच्या सहाय्याने विहिरीतून सुखरूप बाहेर येत उसाच्या शेतात धूम ठोकल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झालेल्या घटनेचाही वन विभागाने पंचनामा केला आहे.
याबाबतची माहिती अशी, कालवडे येथील पाळक नावाच्या शिवारात शिवाजी महादेव थोरात यांची बांधीव विहीर आहे. विहिरीला पायर्‍या नसून केवळ लोखंडी अँगल आहेत. शुक्रवारी सकाळी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या
शेतकर्‍यांना विहिरीतून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले असता बिबट्या लोखंडी अँगलवर बसलेला दिसला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना सांगितली. त्यामुळे कालवडेसह परिसरातील ग्रामस्थांची तेथे गर्दी झाली. उपसरपंच विकास थोरात यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी आले.
उपसरपंच थोरात यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वनविभागास दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विहिरीभोवती नागरीकांची मोठी गर्दी होती. बिबट्याला सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रयत्न सुरू केले. प्रथम नागरीकांना विहिरीपासून दूर केले. गर्दीचा गोंगाट कमी झाल्यानंतर बिबट्या सावध झाला. लोखंडी अँगलच्या आधाराने वर येत अखेर बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, कालवडे गावच्या बाजूला तीन डोंगर असून हा परिसर बिबट्या प्रवण म्हणून ओळखला जातो. वनविभागाकडे कायमस्वरूपी वन मजूर नाहीत. तसेच वन्य प्राण्यांना पकडण्याबाबत वन विभागाच्या मार्गदर्शक सूचना आणि कायदे कडक आहेत. परिणामी, वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी नियम आणि कायद्याचे पालन करावे लागते. तथापी, कालवडे, बेलवडे, कासारशिरंबे, नांदगाव, मनव या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. परिणामी, शेतमजूर शेतात काम करायला तयार नाहीत. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी कालवडे परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी वनक्षेत्रपाल अजित साजणे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक शंकर राठोड, तानाजी मोहिते, योगेश पाटील, संदीप कुंभार, सागर कुंभार, सुजित गवते, अशोक मलप, प्रशांत मोहिते, सुनिता जाधव, अर्चना शिंदे, बाबुराव कदम, रमेश जाधवर यांनी परिश्रम घेतले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिबट्या ज्या विहिरीत पडला, त्या विहिरीचे बांधकाम जमिनीलगत आहे. तसेच
विहिरीला सरंक्षक कठडे नाहीत. त्यामुळे पहाटे भक्ष्याचा पाठलाग करताना
बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री
बिबट्याने तानाजी पांडुरंग थोरात यांच्या शेळीचा फडशा पाडला आहे. हा
प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेचाही पंचनामा करण्यात आला
आहे.

विहिरीत पडलेला बिबट्या नर जातीचा आणि अडीच वर्षे वयाचा होता. त्याने
गुरूवारी रात्री कालवडे शिवारात एका शेळीची शिकार केली. त्यानंतर एखाद्या
भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा. ऊसाची शेती आणि बाजूला
असलेले तीन डोंगर, यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या
संदर्भात वन विभागामार्फत आम्ही उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

– अजित साजणे, वनक्षेत्रपाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)