टाकळी हाजी-येथील तामखरवाडीत बुधवारी (दि. 16) रात्री आठ वाजता बिबट्याने करडाला फस्त केले. वाडीतील ग्रामस्थ सुनील खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पांडुरंग गावडे यांचे घरासमोरून आठ वाजता बिबट्याने करडू पळवून नेऊन फस्त केल्याची घटना घडली. तसेच आज दुपारी देखील आंब्याच्या झाडावर बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे दिवसा व रात्री बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करताना शेतकरी आपला जीव मुठीत धरून काम करीत आहेत. यापूर्वीही प्राण्यांवर हल्ला केल्याच्या येथे अनेक घटना घडल्या आहेत. अद्यापही त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.वनखात्याचे अधिकारी एस. एस. तांदळे यांच्याशी संपर्क केला असता, घटनास्थळी जाऊन पंचनामा करून नुकसान भरपाई घटनाग्रस्तांना मिळणार असल्याचे सांगितले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी टाकळी हाजी येथील सरपंच दामू घोडे व ग्रामस्थांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा