बिताकासाठी अधिकचा निधी द्या 

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे अर्थमंत्र्यांना साकडे
अकोले- गेले 3 वर्षे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. ते केवळ आणि केवळ बिताका गावाकडील पाणी चराने आढळा खोऱ्यात वळवल्याने. सध्या या चराचे काम अपूर्ण आणि तकलादू स्वरूपात आहे. त्यासाठी अधिकचा निधी दिला जावा व हा प्रकल्प जलसंधारण विभागाऐवजी पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केला जावा, असा आग्रह माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अर्थमंत्र्यांकडे धरला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा झालेल्या चर्चेत विद्यमान आमदार वैभव पिचड, अकोले तालुका अमृतसागर दूध प्रक्रिया व व्यावसायिक संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, अगस्तीचे संचालक सुनील दातीर, आदींनी आढळा धरणाबाबत मंत्री मुनगंटीवार यांना माहिती दिली.
आ. पिचड यांनी बिताका परिसरातील पावसाळ्याचे पाणी पश्‍चिम व उत्तर भागात वाहून जाते, ते पूर्वेला वळवण्यासाठी माजी मंत्री पिचड यांनी विशेष प्रयत्न केले; त्याचा परिणाम सध्या चर खोदून झालेला आहे. मात्र, ते काम पक्‍के नसल्याने पावसाळी हंगामात चर फुटत राहतात. परिणामी, या भागातील आदिवासी शेतकरी वर्गाच्या पिकांचे व जमिनीचे नुकसान होते. तरीही जे पाणी अकोले तालुक्‍यात वळवले गेले आहे त्याने न भरणारे आढळा धरण भरण्यास मदतच झालेली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बिताकाचे पाणी आढळा खोऱ्यात वळवण्यासाठी आघाडी सरकारने 3 कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून आदिवासी उपयोजनेतून मंजूर केला होता. त्यातील एक कोटी रुपयांचा निधी वनविभागाकडे शिलकी आहे, तो बिताका चराचे काम पक्‍के होण्यासाठी दिला जावा. शिवाय, हे काम जलसंधारण विभागाकडे दिले आहे, ते काम पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित केले जावे, असा आग्रह धरला. मंत्री मुनगंटीवार यांनी माहिती घेऊन सकारात्मक पावले टाकण्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)