“बिघडलेल्या’ स्थितीला जबाबदार कोण?

वाहतूक कोंडीचा राक्षस शहराला गिळतोय

पुणे – पूर्वी सिमल्यासारखे स्वच्छ, शांत वातावरण, मोकळी, प्रदूषणविरहित हवा असे पुण्याचे वातावरण होते. त्यामुळेच अगदी ब्रिटिश गव्हर्नर पासून ते पेन्शनरांपर्यंत अनेकांनी आरामदायी जीवन जगण्यासाठी पुण्याची निवड केली. परंतु त्याकाळात पुण्याची केलेली व्याख्या आज लागू पडते का, असे विचारले असता उत्तर नक्की “नाही’ असेच येईल. त्यातून शहराच्या “बदललेल्या’ नव्हे “बिघडलेल्या’ स्थितीला जबाबदार काय तर फक्त आणि फक्त वाहतूक कोंडी आणि त्यातून झालेले प्रदूषण हेच उत्तर मिळेल.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून शहराची वाहतूक समस्या उग्र बनली आहे. ‘शहराचा विकास’ या नावाखाली अनेक सोयी सुविधा पुरवत असताना या समस्येकडे कारभाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे जेव्हा ही समस्या उग्र आणि हाताबाहेर गेली तेव्हा याविषयीच्या उपाययोजनांवर बोलायला सुरुवात झाली.

या 15-20 वर्षात लोकसंख्या वाढली तसे मोठे रस्ते, उड्डाणपूल अशा सोयी केल्या गेल्या हेच पोषक वातावरण वाहनांची संख्या वाढायला पुरेसे ठरले. मात्र सोयी सुविधा पुरवताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे ठोस उपाय केले गेले नाहीत. बीआरटी, रिंग रोड यासारखे केवळ प्रयोगच केले गेले. त्याची परिणती म्हणजे आजची शहराची गॅस चेंबर सारखी झालेली स्थिती आहे.

आजही पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नव्याने वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर वाहतूक प्रश्न पहिल्या क्रमांकावर असतो परंतु सत्तेत आल्यानंतर तो लिस्ट मधून गायब होतो.

शहरात 40 लाख लोकसंख्येमागे तितकीच वाहने आहेत. रेशो पाहिल्यास जन्मलेल्या बाळाच्या नावावर ही एक वाहन आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याशिवाय शहरात अन्य ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत रस्ते, पार्किंगची समस्या तीव्र बनली आहे. मेट्रोचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्याचा फायदा मिळण्यास काही कालावधी जाणार आहे. त्यासाठी तत्काळ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. मेट्रोचे काम आता सुरू झाले असले तरी मेट्रो प्रत्यक्षात यायला पाच-सहा वर्षांचा कालावधी उलटेल, अशी परिस्थिती आहे.

पुण्यात सध्या पीएमपीएमएल’ ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माध्यम आहे. तिची परिस्थिती भीषण बनली आहे. तिला सुरळीत करून मार्गावर आणणारा एकही राज्यकर्ता किंवा अधिकारी अद्याप मिळाला नाही. उलट तिचे लचके तोडून खाणारेच जास्त मिळाले. बीआरटी देखील अजूनही प्रयोगशील अवस्थेतच आहे.

पुणे शहराला आवश्‍यकता आहे ती चांगल्या वाहतूक नियोजनाची. त्यासाठी ट्रॅफिक प्लॅनरही चांगला असणे अपेक्षित आहे. पुणे शहरातील सिग्नल सिंक्‍नोरायझेशन कसे असावे, चौकातील आयलंड कसे बांधावेत, फूटपाथ निर्दोष असावेत, वेळोवेळी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारावेत, सदोष डिव्हायडर बांधावेत, असे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही त्याला साथ देत पर्यावरण पूरकतेला पाठिंबा देत ते अंगीकारणेही आवश्‍यक आहे. तरच आपण आणि पुढची पिढी प्रदूषण आणि अपघाताचे बळी पडणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)