‘बिक्रम-बेताल की रहस्यगाथा’मध्ये मकरंद देशपांडे धारण करणार ‘हे’ रूप

अभिनेता, नाटककार आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडे हा कलाकार अनेक गुणांचा धनी आहे आणि प्रत्येक भूमिका त्यांनी सफाईने पार पाडली आहे. आपल्या कलंदर आणि चाकोरीबाहेरच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणा-या देशपांडे यांच्या गाठीशी असंख्य चित्रपट व नाटकांचा अनुभव जमा आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय रंगमंचावरील झळाळते रत्न म्हणून ओळखले जाते.

मोठा पडदा असो वा छोटा पडदा, जेव्हा-जेव्हा मकरंद देशपांडे स्क्रीनवर येतात तेव्हा प्रेक्षकांना अस्सल मनोरंजनाची मेजवानी मिळणार हे नक्की असते. असा हा अष्टपैलू अभिनेता लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे, विक्रमबेताल की रहस्यगाथाया &TV च्या रोमांचकारी महामालिकेमधून! वेताळाची भूमिका चितारताना हा अभिनेता त्या अजरामर व्यक्तिरेखेला आपल्या अंगभूत अभिनयकलेची आणि अनोख्या शैलीची जोड देईल, यात शंका नाही.

महाकवी सोमदेव भट्ट यांनी जवळ-जवळ 2,500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुराण्या कहाण्यांना या मालिकेमध्ये आधुनिक वळण देण्यात येईल. विष्णूगुप्तचा पवित्र आत्मा असलेल्या वेताळाला जमेल त्याप्रकारे मानवजातीच्या कल्याणाचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा राजा विक्रमादित्य वेताळाला पकडण्यासाठी येतो, तेव्हा वेताळाच्या अद्भुताने मंतरलेल्या विलक्षण जगाशी त्याची ओळख होते.

वेताळ एका भव्य, प्रकाशमान, फळाफुलांनी बहरलेल्या सुंदर वनश्रीमध्ये राहतो. त्याच्या या जगाची सैर प्रेक्षकांना एक संपूर्णत: वेगळी गूढ अनुभूती देऊन जाईल. वेताळाचा संपूर्णपणे शुभ्र अवतार, तो ज्याचे प्रतिनिधित्व करतो, त्या चांगुलपणाच्या जगाचे प्रतिक आहे. यात चांगुलपणाबरोबरच शहाणपण आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती हे गुण महत्त्वाचे आहेत. आपल्या स्मृतींमध्ये कोरलेले वेताळाचे संपूर्ण शुभ्र रूप, विक्रमादित्य वेताळाला बांधून आपल्या खांद्यावर लादून घेऊन नेत असताना दिसणारे वेताळाचे पारदर्शक, धूम्राच्छादित पाय तरंगताना प्रेक्षकांना दिसतील. वेताळाचे जग एका भव्यदिव्य दृष्टिकोनातून दाखविले जाणार असून यातील वेताळ आपल्या तिरकस, उपरोधित शैलीमध्ये कूटप्रश्न विचारताना दिसणार आहे. चांगले आणि वाईट यांच्यातील द्वंद्व मांडणा-या या कथा आधुनिक दृष्टिकोनातून सांगितल्या जाणार असून आजच्या युगामध्ये आपल्यासमोर येत असलेल्या आव्हानांवर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. मालिकेचे लेखक आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर सी. एल. सैनी आणि पेनिन्सुला पिक्चर्सचे प्रमुख अलिंद श्रीवास्तव आणि निस्सार परवेझ यांच्या कल्पक विचारांतून या महामालिकेची निर्मिती झाली आहे.

वेताळाची भूमिका साकारण्याबद्दल मकरंद देशपांडे म्हणाले, ”लहानपणी मला विक्रम आणि वेताळाच्या अद्भुत गोष्टींची चांगलीच गोडी लागली होती. त्या काळात मी वेताळाला घाबरायचो तरीही त्याचे जगावेगळे व्यक्तिमत्व मला आकर्षितही करायचे. वेताळाला घाबरण्यापासून ते आज त्याची भूमिका साकारण्यापर्यंतचा हा प्रवास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जुळून आलेला एक विलक्षण योगायोग आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी ही भूमिका म्हणजे एक ड्रीम रोल आहे. ‘विक्रमबेताल की रहस्यगाथा’ या मालिकेच्या निमित्ताने इतक्या वर्षांनंतर टेलिव्हिजनच्या पडद्यावर परतत असल्याचा आणि अशी लक्षणीय भूमिका साकारायला मिळाल्याचा मला आनंद आहे. यातल्या सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तिरेखेचे दिसणे आणि वेताळाला सादर करण्याची पद्धत. याआधी आपण पाहिलेला वेताळ विक्रमादित्याच्या खांद्यावर लटकलेला दिसायचा. हा नव्या वेताळाच्या शरीराचा एखाद्या जीनसारखा तरंगता भाग त्याच्या कंबरेला बांधण्यात आला आहे. या मालिकेमध्ये दाखविण्यात येणा-या गोष्टी आणि दर्जेदार व्हिएफएक्स यांच्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचे भन्नाट पॅकेज असणार आहे. या मालिकेमुळे आजच्या पिढीला विक्रमवेताळाच्या अजरामर गोष्टी आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या नव्या आणि नाट्यमय रुपामध्ये पाहता येतील. या मालिकेचे चित्रिकरण सुरू होण्याची आणि पुढे & TVवरील प्रसारणातून ती प्रत्यक्ष पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)