बिंदू

प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाताना उगाचच मोठं झाल्यासारखं वाटतं. दिवसभर एकाच बाई किंवा गुरुजींसमोर न बसता आता प्रत्येक विषयाला सर आणि मॅडम असतात. शाळेमध्ये असताना अभ्यास करण्यापेक्षा लोकांच्या उचापती करण्यात किती वेळ जायचा ह्याचा हिशोब मांडला तेव्हा कळालं की शाळेमुळे आम्ही घडलो असे मोठमोठे लोक का म्हणून गेले असो.

तिथे गेलो तसा उचापत्या कित्तेक पटीने वाढत गेल्या. आमच्या प्रिय गुरुंजींची सर ह्या सरांना काय येणार अशा पूर्वग्रहांसह प्रत्येक सर आणि मॅडमला खोचून त्रास देण्यास सुरुवात झाली. शाळेतील आज्ञाधारक मुलगा कधी वात्रट झाला ह्याचा काही मेळ नाही लागला. पण ह्या वात्रटपणावर देखील लोकांनी प्रेमच केलं. आजही मागे वळून पाहताना झालेल्या बदलांचा आलेख पाहता चेहऱ्यावरती हसूच उमटतं. आलेखावरून आठवलं. बेरीज वजाबाकी मधून पुढे जाऊन सगळ्यात लहान असा बिंदू काय पहिल्यांदा शिकलो आणि त्या दोन बिंदूंमधून जाणारी अनंत रेषा. आयुष्य ह्या दोन गोष्टींनी व्यापून टाकलं जाईल असं वाटलंही नव्हतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आलेखावर बिंदू काढताना किती लहान बिंदू काढला तर तो अगदी बरोबर ह्यावर मी माझ्या सरांचं डोकं भंडावून सोडलं होत. जर अति लहान काढला आणि तुम्हाला दिसलाच नाही तर ? आणि तुम्हाला दिसावा म्हणून परीक्षेत मी उगाच मोठा बिंदू का काढू? माझं उत्तर जास्त चुकीचं नाही का होणार ? असले सरळसोट फालतू प्रश्‍न विचारत तासंतास वेळ घालवला आहे. पण तेव्हा सर काहीतरी बोलले ते नेहमीच कुठेतरी कोरले गेले आणि पुढचा प्रत्येक धडा ह्या त्या बिंदू भोवती आणि त्या अनंत रेषेभोवती घोळत राहिला. अगदी आजपर्यंत.

सर म्हणाले, कितीही प्रयत्न केला तरी कोणतीही गोष्ट करत असताना काहीतरी राहतंच. काही संज्ञा, संकल्पना ह्यांचं आकलन होणं महत्वाचं. आणि ते आकलन दाखवणं महत्वाचं. शेवटी किती बरोबर किती चूक ह्यापेक्षा ती गोष्ट काय आहे हे समजणं महत्वाचं. तेव्हा त्यातलं काय कळालं ते माहित नाही पण नेहमीचीच डोळ्यासमोर आलेखावर थोडासा बाजूला गेलेला बिंदू सतवायचा आणि मग उगाच त्याला मोठा करून जागेवर आणायचा. पण त्यात मी माझी चूक लपवली आहे हेच लक्षात राहायचं. खर तर चुकांचे भय त्या बिंदूमध्ये गेलं आणि त्या चुकांच्या भोवती मिळवलेल्या शिकवणी गिरवत तो ठिपका बनवत गेलो. लोकांना दाखवण्यासाठी. आणि शेवटी त्या अनंत रेषा बिंदूंचा नव्हे तर ठिपक्‍यांचा संच झाले.

आयुष्य हे नेहमीच मला त्या ठिपका आणि बिंदू ह्यातल्या फरकासारखं वाटत राहिलं. झालेल्या चुकांना कानामागे टाकणं सोप्प होत गेलं. पण तरीही नेमकेपणाने तो बिंदू आलेखावर उतरवणं हे ध्येय नेहमीच मनात राहील. पण नेहमीच हूल देत त्याला ठिपक्‍यामागं झाकलं गेलं. बोर्डात गणितात पैकीच्या पैकी गुण मिळण्याची आस आसच राहिली आणि पहिल्या क्रमांकामधे ती आस झाकली गेली. मग एकामागून एक अशा अनेक आशा झाकत झाकत आशा बाळगणं कधी सुटलं हे समजलं देखील नाही. आहे ते स्वीकारायचं आणि त्यात समाधानी राहायचं हे शिकलो पण तो बिंदू कधीच नेमकेपणानं मी काढू शकलो नाही ही चुकचुक अधूनमधून लागत राहते मनाला. सुख म्हणजे अचूकपणे काही मिळवण्यात नसून मिळालंय ह्याला बरोबर दाखवण्यात आहे असा कुठे तरी समज झाला आणि तेव्हापासून सत्यापासून लांब असलो तरी त्याचं सलणे बंद झालं.

कधी कधी वाटत फक्त परीक्षेत गुण मिळतात म्हणून तो बिंदू म्हणून काढलेला ठिपका मी ठिपकाच समजणं जास्त सोयीस्कर राहिलं असतं. कदाचित सत्याची आस जिवंत राहिली असती. पण कदाचित त्यांनतर आलेखावरचा प्रत्येक आकार काढणं आणि तो दिसणं बंद झालं असतं. आज अजूनही संगणकावर निर्देशांक अगदी बरोबर देऊनदेखील त्या बिंदूचा आकार अपुरेपणाची आठवण देत राहतो आणि अपुरेपण स्वीकारल्याशिवाय गंत्यंतर नाही हे मान्य करायला लावतो.

– अनिकेत मारणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)