बाह्यवळण प्रश्‍न केवळ “मतां’साठीच!

गेल्या अनेक दिवसांपासून राजगुरूनगर आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम गेली अनेक दिवसांपासून रखडले आहे. तर राजगुरूनगर शहराचे बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त मिळत नाही. सर्व्हे मागून सर्व्हे होत आहेत. अनेक राजकीय पुढारी अधिकारी वर्ग या रस्त्याची पाहणी करीत आहेत. निवडणुकांमध्ये आश्‍वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच घडत नसल्याने वाहतूककोंडीचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शासन, राज्यकर्ते यांना या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यसाठी जणू वेळच मिळत नाही की काय असा सवाल अनेकांना पडला आहे. वर्षानुवर्षे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, नागरिकांनी विद्यार्थ्यांनी केवळ वाहतूककोंडी आणि रस्त्यातील मोठे खड्डेच अनुभवले आहेत. आता नवनिर्वाचित खासदारांनी याची पाहणी केली असून आगामी पाच वर्षांत ते हा प्रश्‍न मार्गी लावणार की पुन्हा “ये रे माझ्या मागल्या’ हेच पाहला मिळणार हे येणारा काळच सांगेल.

खेड घाट -मृत्यूचा सापळा वाहतूकीचा अडथळा
खेड घाटात दिवसागणिक अपघात आणि दररोजच्या वाहतूककोंडीने सर्वसामान्य प्रवाशी हैराण झाला आहे. खेड घाटातील रस्त्यातील खड्डे, वेडीवाकडी वळणे, अवजड वाहतूक यामुळे हा रस्ता या ठिकाणी धोक्‍याचा बनला आहे. त्यातच घाटातील वळणे अत्यंत अरुंद असल्याने वाहनांची मोठी घासाघीस होत चालकांच्या भांडणामुळे वाहने रस्त्यात थांबवल्याने कोंडी होत आहे. या घाटाला पर्यायी बाह्यवळण मार्ग काढला आहे मात्र, एका ठिकाणी हे काम अपूर्ण आहे. गेली अनेक दिवस ते बंदच आहे. कोंडी आणि खड्डे यामुळे अपघात होत असून पुणे-नाशिक महामार्गाचा प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. घाटाचे बाह्यवळण लवकर होणे गरजेचे आहे. मात्र, ते होत नसल्याने प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे.

राजगुरुनगरचा अरुंद पूल
राजगुरुनगर शहातील एसटी बस स्थानकाजवळील पुणे-नाशिक महामार्गावरील अरुंद पूल वाहतुकीस कारणीभूत ठरत आहे. राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्याचा प्रश्‍न भिजत घोंगड्यासारखा बनला आहे. गेली अनेक वर्षांचा हा प्रश्‍न आहे; मात्र केवळ या कामाचे भूमिपूजनाचे नाटक झाले आहे. उर्वरित काम मात्र प्रत्यक्षात सुरूच होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. खासदार, आमदार, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक नेते त्यांच्यासोबत पाहणी होते. आश्‍वासने मिळतात पुढे मात्र काहीच होत नाही.

एकूणच पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट ते चाकण-मोशीपर्यंत मोठ्या समस्या असताना त्या तात्काळ सोडविण्यात केंद्र शासन दुर्लक्ष करीत आहे. खड्डे, वाहतूककोंडी या प्रश्‍नांनी प्रवासी, स्थानिक नागरिक, वाहनचालक हैराण झाले असल्याने त्यावर उपाययोजना होत नाही. तासन्‌तास वाहतूककोंडीची झुंज द्यावीच लागत आहे. देशातील वाहतूककोंडीचा एकमेव महामार्ग आणि राजगुरूनगर हे ठिकाण आता बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)