बाह्यवळणाचे घोडे गंगेत न्हाले

file photo

खेड, नारायणगावसाठी 75 कोटींची अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध

राजगुरुनगर- खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या 9.5 किमी कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 75 कोटी रकमेची स्वतंत्र व अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील अडीच ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊन खेड-सिन्नर महामार्गावरील मुख्य ठिकाणी भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, गेली दीड वर्षांपासून खेड-सिन्नर महामार्गावरील पाच बाह्यवळणांची कामे पूर्ण करण्यात ठेकेदाराला अपयश आले होते. त्यामुळे ही कामे डिस्कोप करून पाच बाह्यवळणांची नव्याने निविदा काढावी व नवीन ठेकेदार देऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आपली मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली होती. या पाच बाह्यवळणांची सुमारे 450 ते 500 कोटींची कामे एकत्र निविदा राबवून काम सुरु केल्यास कामाला आणखी विलंब होईल हे गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत या कामांपैकी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणांची कामे अल्प मुदतीत स्वतंत्र निविदा राबवून केल्यास 2 ते 3 माहित्यांत कामे पूर्ण होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आग्रही मागणी गडकरी यांच्याकडे केली होती.
यासंदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे चेअरमन, सचिव व इतर अधिकाऱ्यांना नवी दिल्लीमध्ये भेटून पाठपुरावा केला होता. तीन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गकारी यांना भेटून या मार्गावरील वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर त्याचवेळी गडकरी यांनी निर्णय घेत खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण कामाची अल्पमुदतीत निविदा राबवून तात्काळ काम सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर लगेचच शुक्रवारी (दि. 23) सुमारे 9.5 किमी लांबीच्या 75 कोटी रुपये कामाची निविदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया 7 जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर पात्र ठेकेदाराकडून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

  • त्या कामांचीही लवकरच निविदा
    खेड घाट व नारायणगाव येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे रस्ते लवकर वाहतुकीस खुले व्हावे यादृष्टीने ही स्वतंत्र निविदा राबविण्यात आली असून उर्वरीत मंचर, आळेफाटा, कळंब व खेड बाह्यवळण कामांचीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण ही कामे सुरू होण्याबरोबरच उर्वरीत बाह्यवळण कामेही साधारणपणे फेब्रुवारी-मार्च 2019 च्या दरम्यान निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुरू होणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)