बाहुबली रथाच्या 25 फूटी प्रतिकृतीत विराजमान झाला कसब्याचा राजा

पुणे – आखीव-रेखीव शिल्पे आणि विविधरंगी विद्युतरोषणाईने सजलेल्या बाहुबली रथाची तब्बल 25 फूटी प्रतिकृती कसबा पेठ तांबट आळी माणिक चौकातील जर्नादन पवळे संघाने उभारली आहे. मंडळाच्या 76 व्या वर्षानिमित्त हा वैशिष्टयपूर्ण देखावा साकारण्यात आला असून हा रथ ओढताना गणेशभक्तांना सेल्फी काढता यावा, याकरीता सेल्फी पॉईंटची विशेष सोय शहरात प्रथमच करण्यात आली आहे.
देखाव्याचे उद्‌घाटन मंडळाचे अध्यक्ष महेश खरवलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष राकेश डाखवे, उपाध्यक्ष सुशांत कर्डे, बाप्पूसाहेब भेगडे, नितीन शितोळे, मोहन पोकळे, दिनेश डाखवे, योगेश समेळ, मार्गदर्शक दीपक मानकर यांसह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक सिद्धार्थ तातुसकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.
बाहुबली रथाच्या प्रतिकृतीची उंची 25 फूट असून लाकडी फळ्या, प्लायवूड, थर्माकोल, फेव्हिकोल आणि विविधरंगांचा वापर देखाव्याकरीता करण्यात आला आहे. याशिवाय बाहुबली चित्रपटातील हत्तीची प्रतिकृती देखील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. बाहुबली रथ हा चारही बाजूंनी एकसारखाच दिसेल, अशा 4 डी प्रकारात करण्यात आला आहे. त्यावर गणरायाची मूर्ती विराजमान झाली असून चांदीची विविध प्रकारची आभूषणे कसब्याच्या राजाच्या मूर्तीची शोभा वाढवित आहे. प्रतिकृतीवर लावण्यात आलेले रंगी-बेरंगी लाईटस्‌ हे देखाव्याचे खास वैशिष्टय आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)