बास्केट बॉल मैदानाला वाली कोण?

पिंपरी – मोशी प्राधिकरणातील स्पाईन रोड लगत सेक्‍टर क्रमांक 9 मधील व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत बास्केटबॉल क्रीडांगणाला सध्या कोणीच वाली नसल्याने इमारतीची दूरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत सध्या धूळखात असून येथे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहेत. पालिकेने इमारतीच्या देखभालीसाठी व सुरक्षेसाठी एकही कर्मचारी नेमला नसल्याने परिसरातील मद्यपींसाठी हे क्रीडांगण हक्काचे झाले आहे. काही अघटित झाल्यावर महापालिकेला जाग येणार आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बास्केट बॉल क्रीडांगणाचे दरवाजे उघडेच असतात. मात्र, आतमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली असून परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. येथे बास्केट बॉल खेळण्यासाठी तीन मैदाने तयार केली आहेत. मात्र, येथे क्रिकेट खेळण्यासाठी लावलेले दगड दिसून आले. तसेच काही मुलांचा ग्रुप येथे संध्याकाळी फुटबॉल खेळण्यासाठी येतो. त्यांना येथे बास्केट बॉल खेळण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. बास्केट बॉल खेळण्यासाठी येथे प्रशिक्षक नाही. फक्‍त क्रीडांगण उभे असून बास्केट बॉल कोर्ट देखील अपूर्ण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणत्याच खोलीला कुलूप नसल्याने आतमध्ये शिरायला आडकाठी होत नसल्याने सर्वासाठी खोल्या उघड्याच आहेत. कोणीही आतमध्ये शिरकाव करत आहे. स्वच्छता गृहामध्ये साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. तेथे असलेल्या नळाच्या तोट्या लंपास करण्यात आल्या असून तिथे घाण केली आहे. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंध पसरत आहे. जागोजागी गुटखा व तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारून नव्या कोऱ्या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून त्याबरोबर पाण्याच्या बाटल्या अन्‌ ग्लासामुळे इमारतीमध्ये साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात जळमटे झाली आहेत. तसेच इमारतीमध्ये बसविलेले दिवे फोडण्यात आले आहेत. परिसरात इमारतीमध्ये काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. त्या चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे त्या दिसून येत आहे.

बास्केट बॉल क्रीडांगणाशेजारी खांबावरील दिवे सुद्धा लंपास करण्यात आले आहे. तसेच क्रीडांगणाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. यामुळे बास्केट बॉल क्रीडांगण बांधण्याचा महापालिकेचा उद्देश काय होता असा, सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केलेल्या विकास प्रकल्पांना अडगळीत टाकण्याचा एकमेव उद्योग विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. त्यांच्या विकास कामांचा विसर पडावा, यासाठी भाजपकडून ही खेळी केली जात आहे. “अडवा व जिरवा’ च्या राजकारणात सद्यस्थितीत महापालिकेच्या अनेक मिळकती धूळखात आहेत. प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 9 मधील चार क्रीडा संकुले पूर्ण केल्यानंतर प्राधिकरणाने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत. परंतु, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. ही क्रीडा संकुले भाडेतत्त्वावर अथवा संस्थेला चालवण्यास देण्याचे कोणतेही धोरण ठरले नाही. याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा व पत्र व्यवहार करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. ही क्रीडांगणे खेळाडू व नागरिकांसाठी खुली करावीत.
– संजय वाबळे, सदस्य, महापालिका क्रीडा समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)