बाल शल्य विशारदाची समाजाला मोठी गरज

बालशल्यविशारद हे मुलांच्या जन्मदिवसापासून ते 15 वर्षांपर्यंत उपचार करतात. अलीकडे बालशल्य चिकित्साशास्त्र प्रगत झाले आहे. काही मुलांमध्ये येऊ शकणारे जन्मजात व्यंग्य ते मूल मातेच्या गर्भात असतानाच प्रसूतीपूर्व शस्त्रक्रिया करून दुरुस्त करता येतात. या शस्त्रक्रिया करणारे बालशल्यविशारद हे जनरल सर्जन तर असतातच, त्याशिवाय लहान मुलांवरील शस्त्रक्रिया, त्याची गंभीरता, निदान या सर्वांचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात.

बालशल्यविशारद हे एम.एस. जनरल सर्जन असतात. शिवाय लहान मुलांवरील शस्त्रक्रिया, त्याची गंभीरता, निदान, काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या सर्वांचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात, त्यांना बालशल्य विशारद असे म्हणतात.
शारीरिक विकृती किंवा व्यंगाबद्दल असलेल्या जागृतीमुळे प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ व सोनोलॉजिस्ट बाळाच्या जन्माआधीच गर्भामधील व्यंगाचे निदान करून संभाव्य आई-वडिलांना बालशल्यविशारदांचा सल्ला घेण्यासाठी पाठवतात.

बालशल्यविशारद बाळामध्ये कोणत्या प्रकारचे व अवयवाचे व्यंग आहे, ते दुरुस्त करता येईल का आणि शस्त्रक्रिया कोणत्या वेळी योग्य असेल (कोणत्या वयात) याचे मूल्यमापन करून मातापित्यांशी आणि प्रसूतीतज्ज्ञांशी यासंबंधी चर्चा करतात. या पद्धतीने योग्य उपचार योग्य वेळी देता येतात. तसेच पालक मानसिक व आर्थिकदृष्ट्या तयारीत राहतात.

बालशस्त्रक्रियाशास्त्र व बधिरीकरण शास्त्र आता प्रगत झाले आहे. नवजात अर्भके, कमी वजन असतानासुद्धा शस्त्रक्रिया सहन करू शकतात व पुढील आयुष्य अगदी व्यवस्थित जगू शकतात. काही जन्मजात व्यंगे उदा. अन्ननलिका व श्‍वसननलिका जोडलेली असणे, आतडी व अवयव छातीत घुसणे, आतडी पूर्णपणे न बनणे, गुदद्वार नसणे, किडनीला सूज असणे, मेंदूचा भाग बाहेर असणे, मणक्‍याची गाठ वगैरे अनेक प्रकारच्या व्यंगांची शस्त्रक्रिया ते अगदी सहजपणे करून घेता येतात.

लहान मुलांना गळू होणे, हार्निया, टेस्टीज वर असणे, पोट दुखणे, लघवी व शौचाच्या वाटेची व्यंगपूर्ण रचना वगैरेंसाठी बालशल्यविशारदाचीच गरज असते. बऱ्याच पालकांना या विकारांविषयी माहिती नसते. काही पालक बाळाच्या व्यंगाविषयी योग्य सल्ला न मिळाल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे, शस्त्रक्रियेसाठी योग्य वय टळून गेल्यानंतर बालशल्यविशारदांकडे येतात.

तसेच, अपघातात जखमी झालेल्या मुलांवर उपचार करण्यातही बालशल्यविशारद महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
लहान मुलांमधील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उदा. किडनी व लघवीच्या वाटेची संबंधित शस्त्रक्रिया, कन्सल्ट शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या बालशल्यविशारदकांकडून वेळीच करून घ्याव्यात. ते बाळाच्या शरीररचनेशी परिचित असतात. मूल म्हणजे प्रौढांची फक्त लहान प्रतिकृती असे नसते. हे सर्व पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्यांच्या आजारासाठी योग्य विशेषज्ञांचा सल्ला घेतला व योग्य वेळी उपचार केले, तर लहान मुलांमधील आरोग्याच्या गंभीर समस्या सुसह्य होण्यास आणि सुलभतेने सुटण्यास मदतच होईल.

काय करावे?

काही जन्मजात व्यंगांच्या शस्त्रक्रिया या पुढीलप्रमाणे करणे आवश्‍यक ठरते
हार्निया- निदान झाल्यानंतर तातडीने कराव्यात.
हायपॅडिअस- सहा महिने
दुभंगलेला ओठ- तीन महिने
दुभंगलेला टाळा- दहा महिने
वर असलेली टेस्टीज- सहा महिने
अथवा या शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या मार्गदर्शनानुसार करून घेणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)