बालेवाडीत मृतदेह पोहचताच काळीज हेलावले

जनसमुदाय गहिवरला : केदारी कुटुंबातील बालगोपाळाचा मेळा लुप्त

पुणे – मुलाचा नवस फेडण्यासाठी गणपतीपुळे येथे गेल्यानंतर पुण्याला परतताना केदारी कुटुंबीयातील सात जणांवर काळाने घाला घातला. या अपघातात केदारी कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्‍का बसला आहे. केदारी कुटुंबातील कर्ता आधार हिरावल्यामुळे संपूर्ण बालेवाडी शोकसागरात बुडाली. दुपारी पावणेचारच्या सुमारास मृतदेह बालेवाडीत पोहचताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.

संपूर्ण परिसर गहिवरून गेला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नेहमी बालगोपाळाच्या गोतावळ्यात वावरणाऱ्या या कुटुंबातील सात जण काळाआड झाले.

बालेवाडी गावातील नामदेव भाऊ बालवाडकर यांची कन्या मंदा हिचा विवाह भरत केदारी यांच्याशी सुमारे 40 वर्षांपूर्वी झाला होता. या केदारी कुटुंबातील बारा जण मिनी बसने गणपतीपुळ्याला देवदर्शनाला गेले होते. निमित्त होते सचिन केदारी यांच्या आराध्य या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्याचे. या सोहळ्यात त्यांच्यासोबत बहीण छाया नांगरे आणि मनीषा वरखडे यांच्यासह कुटुंबीयही सहभागी होते. गणपतीपुळे येथील नवस फेडण्याचा कार्यक्रम उरकून सर्व कुटुंबीय कोल्हापूरच्या दिशेने परत येत होते. मिनी बस कोल्हापूरमधील पंचगंगा पुलावर आल्यानंतर मिनी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात ही बस पुलाचा कठडा तोडून पाण्यात बुडाली. या अपघातात केदारी कुटुंबातील सात, नांगरे कुटुंबातील दोन आणि वरखडे कुटुंबातील तीन जणांना नदीपात्रातच जलसमाधी मिळाली. या घटनेचे वृत्त पसरताच संपूर्ण बालेवाडी परिसरावर शोककळा पसरली. नातेवाईक, मित्र परिवार केदारी कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांना धीर देत होते.

बालेवाडी येथे राहणाऱ्या केदारी कुटुंबातील मुलगा, मुलगी सुना, नातवंडे अशा एकूण सात जणांवर काळाने रात्री झडप घातली. यात केदारी कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडले आहे. अपघाताचे वृत्त समजताच समाजमन गहिवरून गेले. ज्यांनी आयुष्य जगायला नुकतीच सुरूवात केली होती, अशा 9 महिन्यांपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या सात जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

केदारी यांचे घर नातवंडांनी कायम गजबजत असायचे. ते आता सुन्न झाले आहे. यातील साहिल इयत्ता नववीत तर त्याची बहीण श्रावणी सहावीच्या वर्गात होते. संस्कृती दुसरीला तर प्रतीक नांगरे दहावीची परीक्षा देणार होता. शनिवारी दुपारी केदारी कुटुंबाच्या घराबाहेर आठ जणांच्या अंत्यसंस्कार आणि लहान मुलाच्या दफनासाठीही तयारी करण्यात आली होती. क्षणाक्षणाला घराच्या बाहेर गर्दी वाढत होती आणि त्याचबरोबर नातेवाइकांचा टाहोदेखील…! आता घरात कोणी कोणाला सावरायचं, असाच प्रश्न प्रत्येकांसमोर उभा राहिला होता. हा काळाने घातलेला घाला प्रत्येकाच्याच हृदयाला चटका लावून जाऊन जात होता. प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू तरळून जात होते.

तीन जखमीपैकी मंदा भरत केदारी (60) व प्राजक्‍त्ता दिनेश नांगरे (18) यांना (बालेवाडी) यांच्या घरी सोडले असून मनीषा संतोष वरखडे (38, पिरंगुट) यांची प्रकृती चिंताजनक आहे. भरत केदारी यांचे मूळ गाव पवन मावळमधील कुसगाव हे असून ते बालेवाडी येथे सासुरवाडीत राहण्यास आले होते. मोठा मुलगा दिलीप हा शेती व्यवसाय करतो. तर लहान मुलगा सचिन डायव्हरचे काम करत होता. सचिन केदारी यास मुलगा झाल्यामुळे सचिन त्याची पत्नी निलम, मुलगी संस्कृती, मुलगा सान्निध्य यांच्यासह आई मंदा केदारी तसेच दोन बहिणी छाया नांगरे व मनीषा वरखडे यांच्यासह एकूण डायव्हरसह 16 जण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले होते. वडील भरत केदारी व मोठा मुलगा दिलीप केदारी हे कामामुळे गणपतीपुळे येथे गेलेले नव्हते. नांगरे कुटुंबीयही बालेवाडी येथे राहतात. छाया नांगरे या बाणेरमधील डोअर स्टेप स्कुलमधे शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत चांगला असून त्या कोणाच्याही मदतीला धावून जात असत, अशी भावना त्यांच्या सहकारी स्वाती सूर्यवंशी यांनी व्यक्‍त्त केल्या.

आज पावणेचारच्या सुमारास कोल्हापूर येथून चार रूग्णवाहिकेमधून हे मृतदेह पुण्यात आणण्यात आले. माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या समवेत अमित चौगुले, महेश जाधव, मधुकर चव्हाण, अशोक निगडे, धैर्यशिल जाधव यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना त्यांनी बालेवाडीपर्यंत पाठविले होते. कोल्हापूर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनीही रात्री हॉस्पिटलला भेट दिली व शक्‍य ती सर्व मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)