बालादपि सुभाषितम्‌ 

 डॉ. न. म. जोशी 
पुण्याच्या आदर्श शिक्षण मंडळींच्या डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी आपल्या संस्थेतील सर्व शिक्षकांना आपल्या अनुभवांचं लेखन करायला सांगितलं शिक्षक, प्राध्यापक यांनी आपले अनुभव मोकळेपणानं लिहिले. या लेखांतून एक सुंदर शिक्षण चित्र निर्माण झालं. त्यातलाच एक विलक्षण अनुभव छोट्या गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षिकेनं मांडला. त्याचं असं झालं…
एकदा बाई एका वर्गात आल्या. मुलं चूपचाप बसली. मग बाईंनी मुलांना सांगितलं, “आता आपला चित्रकलेचा तास.’ मुलं खूश झाली. मुलं आणखी खूश झाली ती बाईंच्या आणखी एका घोषणेमुळे बाई म्हणाल्या,

“मी काहीही शिकवणार नाही. तुम्हाला कागद आणि निरनिराळ्या रंगांच्या पेन्सिली देणार आहे. तुम्ही तुमच्या मनानं हवी ती चित्रं काढा. हवी तशी काढा.’ मग काय मुलं खूशच.
बाईंनी प्रथम सर्वांना कागद वाटले. पांढरे स्वच्छ ड्रॉईंग पेपर. मग बाईंनी सर्वांना निरनिराळ्या रंगांच्या पेन्सिली दिल्या. तांबडी, पिवळी, हिरवी, निळी… आणि ही त्यात पांढरी पेन्सिलही होती बरं का. पेन्सिली वाटता वाटता एका मुलाला एकच पेन्सिल दिली गेली.

बाकीची मुलं भराभर चित्रं काढू लागली. हा मुलगा आपला इकडं तिकडं बघत होता. शेजारच्या त्याच्या मित्रानं त्याला विचारलं,
“तुला नाही का चित्र काढायचं?’
“काढायचंय ना. पण आपल्या बाई बिनडोक आणि बावळट आहेत.’
“ए, बाईंना बिनडोक आणि बावळट म्हणतोस? सांगू का?’ मित्र म्हणाला.
“सांग सांग. बाई आहेतच बिनडोक आणि बावळट. अरे ही पेन्सिल बघ. मला पांढरी पेन्सिल दिलीय. आता पांढऱ्या कागदावर पांढऱ्या पेन्सिलीनं मी चित्र कसं काढणार? मग बाई आहेत की नाही बिनडोक आणि बावळट?’
बाईंना हे समजलं. तेव्हा क्षणभर त्यांना राग आला. पण त्यांनी नंतर विचार केला. त्या मुलाचं म्हणणं बरोबरच होतं. मग त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं. प्रेमानं पाठीवरून हात फिरवला. त्याला दुसरी रंगीत पेन्सिल दिली. मुलगा खूश! बाईंनी “बालादपि सुभाषितम्‌’ यांचा अर्थ न रागवून प्रत्यक्षात समजून घेतला होता.

कथाबोध

मुलांची कल्पनाशक्‍ती अनेकवेळा मोठ्या माणसांपेक्षाही भरारी मारणारी असते. त्याची विचारशक्‍तीही चांगली असते. फक्त आपल्या प्रतिक्रिया ते बालसुलभ पद्धतीनं व्यक्त करतात. बाईंना बावळट आणि बिनडोक म्हणणारा मुलगा वांड किंवा निर्बुद्ध नव्हता. ते त्याचं सुभाषितच होतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)