बालगंधर्व पुरस्काराकडे प्रेक्षक, पालिका पदाधिकाऱ्यांची पाठ

शंभर ते दीडशेच प्रेक्षकांची उपस्थिती : चंद्रशेखर देशपांडे यांना पुरस्कार प्रदान

पुणे – बालगंधर्व रसिकांचे आराध्य.. मात्र त्यांच्या नावे पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराकडे मात्र रसिकप्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रसाठी केवळ दीडशे ते दोनशे प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे पालिकेने ज्यांची निमंत्रक म्हणून नावे निमंत्रण पत्रिकेत छापली त्यातील एक दोन निमंत्रक सोडले तर कोणीही या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते.
पुणे महापालिकेतर्फे प्रतिवर्षी बालंगधर्व जयंतीनिमित्त मराठी संगीतनाट्य क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ कलाकारास बालगंधर्व पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार ऑर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महापौर मुक्‍ता टिळक, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, चंद्रशेखर देशपांडे, तसेच विशेष पुरस्कारार्थी पौर्णिमा धुमाळे (गायिका), डॉ. राम साठ्ये (संगीत नाटक कलाकार), ऋषी मनोहर (पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक), अनिल टाकळकर (प्रकाश योजनाकार), दत्ता गाडेकर (नेपथ्य निर्मिती) आदी उपस्थित होते.
यावेळी देशपांडे यांच्या वतीने त्यांच्या शिष्या अंजली पानसे यांनी त्यांचे भाषण वाचून दाखविले. ते म्हणाले, बालगंधर्वच्या पायाभरणीच्या वेळी बालगंधर्व स्वत: उपस्थित होते. त्यावेळी रसिकांनी बालगंधर्वांना नाट्यसंगीत सादर करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी माझ्या वडिलांना हरिभाऊंना गाण्याची संधी दिली आणि आज त्यांच्या नावे मला पुरस्कार मिळतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. गेली 65 वर्षे मी नाट्यसंगीताचे दान करत असून यात मला कुटुंबियांची साथ मिळाली असेही ते म्हणाले.
यावेळी शिलेदार म्हणाल्या, बालगंधर्वांच्या नाट्यसंगीताने प्रांतभेद, भाषाभेद विसरून नाटक सर्वत्र नेले. आज बंगालमध्ये, आंध्रात, गुजरात, पंजाबमध्ये गंधर्वसूर ऐकायला मिळतात. चित्रपट संगिताची नांदी ही देखील नाट्यसंगितातूनच आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालिकेचे निमंत्रकच गैरहजर
पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निमंत्रण पत्रिकेत मुक्‍ता टिळक धरून 20 पदाधिकाऱ्यांची नावे होती. यामध्ये पालिका आयुक्‍त सौरभ राव, उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, योगेश मुळीक, श्रीनाथ भिमाले, चेतन तुपे, अरविंद शिंदे, वसंत मोरे, संजय भोसले तसेच अनेक पक्षनेत्या व नगरसेकांची नावे होती. मात्र यातील केवळ मुक्‍ता टिळक, नगरसेविका डॉ. माधुरी सहस्त्रबुध्दे, निलिमा खाडे व जोत्स्ना एकबोटे वगळता कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आधीच बालगंधर्वसारखा मोठा पुरस्कार सुटीच्या दिवशी न ठेवल्यामुळे तसेच संध्याकाळच्या वेळी न ठेवल्यामुळे रसिकप्रेक्षकांना हजेरी लावता आली नव्हती. त्यातच पदाधिकाऱ्यांनीही याला गैरहजेरी दर्शविल्यामुळे एकूणच कार्यक्रम दीड दोनशे प्रेक्षक वगळता रिकाम्या खुर्च्यांदेखत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)