‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासासाठी 52 प्रस्ताव

21 जानेवारीपर्यंतची मुदत प्रशासन वाढविणार?

पुणे – बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी प्रशासनाने नोंदणीकृत वास्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी असून आतापर्यंत तब्बल 52 जणांनी या विकसनासाठी प्रशासनास पत्र दिले आहे. त्यातील काहीच जणांचे प्रस्ताव दाखल झालेले असून उर्वरित प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने यापूर्वी या कामासाठी सादर केलेल्या प्रस्तावास नाट्य कलावंत तसेच रसिकांनी विरोध केल्याने तो बारगळला होता. यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सन 2018-19 च्या अंदाजपत्रकात 10 कोटींची तरतूद केली आहे. तर, हे काम करताना नाट्य क्षेत्रातील कलावंतांसह सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या नाट्यगृहाच्या परिसरात भविष्यात मेट्रो स्थानक, वाहनतळ याशिवाय उर्वरित भागांचे विकसन केले जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने 9 डिसेंबर 2018 रोजी निवेदन जाहीर केले होते.

पुढील वर्षात तरतूद वाढविणार
महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात या पुनर्विकसनासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली होती. मात्र, या प्रस्तावावरून वाद निर्माण झाल्याने तो मागे पडला होता. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला असला, तरी पुनर्विकसनाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर सांस्कृतिक, कला तसेच या क्षेत्रातील संबधित तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. त्या नंतरच हा पुनर्विकास आराखडा अंतिम केला जाणार आहे. त्यामुळे या वर्षात ही तरतूद खर्ची पडलेली नाही. त्यामुळे या 10 कोटी रुपयांतील सुमारे 65 लाखांच्या निधीचे शहरातील वेगवेगळ्या नाट्यगृहांच्या स्वच्छतेसाठी वर्गीकरण करण्यात आले असून उर्वरित 9 कोटींचा निधी खर्ची पडणार नाही. त्यामुळे पुढील अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असे आहेत दोन पर्याय
“बालगंधर्व’च्या पुनर्विकासासाठी महापालिका प्रशासनाने दिलेल्या निवेदनात दोन पर्यायांवर प्रस्ताव मागविले आहेत.
1. रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी प्रचलित डी.सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे.

2. इमारत कायम ठेवून सध्याच्या नाट्यगृह इमारतीत आवश्‍यक सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी डिझाईन सादर करणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)