बालकांपर्यंत सकारात्मक साहित्य पोहचवण्याची गरज

माधुरी सहस्त्रबुध्दे यांचे आवाहन : ग्रंथमहोत्सवात परिसंवादाचे आयोजन

सातारा – सामाजात घडणाऱ्या घटना टिव्ही आणि वर्तमानपत्रातील बातम्यांच्या माध्यमातून पाहिल्यामुळे नकारात्मक मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे बालकांपर्यंत सकारात्मक साहित्य पोहचविणे गरजेचे आहे आणि त्याची मोठी जबाबदारी बालसाहित्यकांवर आहे, असे मत माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यात आयोजित ग्रंथमहोत्सवात, वाचन संस्कृती वाढीसाठी शिक्षक-पालक आणि ग्रंथपालाची भूमिका या विषयावर परिसंवाद कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण संचालक दिनकर पाटील, शिक्षण उपसंचालक प्रिया शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे, लेखिका संगिता बर्वे, माधव राजगुरू, माजी मुख्याध्यापक कमलाकर महामुनी, श्रीकांत चौगुले आदी उपस्थित होते.

सहस्त्रबुध्दे म्हणाल्या, लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी कविता व गोष्टी सांगणे महत्वाचे आहे. वाचन आपला आहार आहे आणि जसा आहार घेतो तसे आपण बनतो हे देखील सांगितले पाहिजे. केवळ टिव्ही अथवा मोबाईलवर पाहिलेले रूचत आणि पचत ही नाही. त्यासाठी पुस्तकेच वाचणे आवश्‍यक आहे. तसेच मुलांनी देखील स्वत:ला प्रश्‍न पडले पाहिजेत असे विचार केल्यास वाचनाची आवड सहज निर्माण होवू शकेल, असे त्यांनी एका कवितेच्या माध्यमातून सांगितले.

संगिता बर्वे म्हणाल्या, पुस्तक हा आपला खरा मित्र आहे. त्याचे बोलणे आपण वाचनातून ऐकू शकतो तर वहीत लिखाण करून पुस्तकाशी बोलू ही शकतो. प्रत्येक मुलाने किमान रोज एक कविता वाचयला हवी. वाचनाने भाषा समृध्द होते आणि शब्द संपत्ती ही वाढते, असे त्यांनी सांगितले.

कमलाकर महामुनी म्हणाले, समाजात आज साक्षर होवून ही वाचन न करणाऱ्यांचा निरक्षर म्हणूनच उल्लेख करणे गैर ठरणार नाही. त्याचबरोबर घरा घरामध्ये आज पुस्तकांची उपलब्धता कमी होत आहे हा चिंतेचा विषय आहे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता शिकविताना ताल व लयबध्द सादरीकरण केल्यास वाचन संस्कृती निश्‍चितपणे वाढू शकणार आहे. त्याचबरोबर विद्यालयांनी वाचन स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे असून शिक्षक व ग्रंथपालांनी एकत्र येवून वाचन समृध्दीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

माधव राजगुरू म्हणाले, वाचन संस्कृती वाढविण्याची जबाबदारी जशी शिक्षक, पालक व ग्रंथपालांवर निश्‍चित करण्यात येत आहे तशी समाजातील उच्चभ्रु व्यक्तींवर देखील निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे. मुलत: वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मराठी माषा जिवंत ठेवण्याचे आव्हान सध्या समोर आहे. भाषा जिवंत राहिली तर जतन करता येईल मात्र भाषाच टिकली नाही तर जतन कसे करणार, असा प्रश्‍न राजगुरू यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)