बालकांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींना सोडणार नाही – योगी अदित्यनाथ

गोरखपुर – गोरखपुर येथे ऑक्‍सिजन सिलिंडर अभावी अनेक बालकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला असताना या प्रकरणाची उत्तरप्रदेश सरकारने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिली. यातील दोषी व्यक्तींना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.हा प्रकार कसा घडला आणि त्याला नेमके कोण कारणीभूत आहे याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेविषयी चिंता व्यक्‍त केली असून या प्रकरणी केंद्राकडून आवश्‍यक ती सर्व मदत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नढ्ढा यांच्या समवेत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी आज गोरखपुर मधील ज्या हॉस्पीटल मध्ये सरकारी अनास्थेमुळे बालके दगावली त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पत्रकारांना या घटनेविषयी चुकीच्या बातम्या पसरवू नका अशा सुचना केल्या.पत्रकारांनी वॉर्डात जाऊन संबंधीत रूग्णांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोलूनच या घटनेच्या वार्तांकनाचे काम करावे अशी सुचनाहीं त्यांनी केली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नढ्ढा म्हणाले की या घटनेबाबत केंद्र सरकार राज्याला आवश्‍वक ती सारी मदत करीत आहे. गोरखपुर जिल्ह्याच्या परिसरात पाण्यामुळे लहान मुलांना विशिष्ट प्रकारच्या रोगाची बाधा होत असल्याची जूनी तक्रार असून या बाबत संशोधन करण्‌यासाठी गोरखपुरला एक केंद्र स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असे ते म्हणाले.

रूग्णालय प्रशासनावर ठपका
बाबा राघवदास सरकारी रूग्णालयाला ज्या कंत्राटदाराकडून ऑक्‍सिजन सिलींडरचा पुरवठा केला जात होता त्या कंत्राटदाराचे आधीचे बिल अदा न केल्याने त्याने ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा थांबवला होता त्यातून किमान 30 बालके दगावली आहेत. या संबंधात जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यात रूग्णालयाच्या प्रशासनानेच कंत्राटदाराचे पैसे थकवल्याची बाब समोर आली आहे. रूग्णालय प्रशासनाने 5 ऑगस्ट पर्यंतची बिले दिली आहेत पण नंतरची बिले त्यांनी थकवली होती त्यामुळे कंत्राटदाराने सिलिंडर पुरवले नाहीत. याला प्रशासनाचा लालफितीचा कारभार जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तथापी सरकारने संबंधीत कंत्राटदाराच्या आस्थापनांवरही छापेमारी करून त्यालाही याबाबत जबाबदार धरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)