बार कौन्सिल निवडणुकीत मुख्यमंत्री करणार मतदान

दि. 28 मार्च रोजी मतदान


तब्बल आठ वर्षांनंतर होणार निवडणूक


महाराष्ट्र, गोव्यासह दोन केंद्रशासित प्रदेशांत होणार प्रक्रिया

 

विजयकुमार कुलकर्णी
पुणे – राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणूकीत यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान करणार आहेत. नागपूरच्या यादीत त्यांचे नाव असून, मुंबईतील मुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या “वर्षा’ बंगल्यात राहत असल्याचे मतदार यादीत नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यात, दादर नगर हवेली, दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशात येत्या 28 मार्च रोजी जिल्हा, तालुक्‍याच्या ठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणूकीत 164, तर पुणे जिल्ह्यातून 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर लागलेल्या या निवडणुकीबाबत वकिलांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यातून, दादर नगर हवेली आणि दिव, दमण या दोन केंद्रशासित प्रदेशातून मिळून सुमारे 1 लाख 22 हजार 244 वकील मतदान करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सुमारे 14 हजार 398 वकील मतदार आहेत. त्यापैकी सुमारे साडेअकरा हजार वकील पुणे शहरातील आहेत. उर्वरित जिल्ह्यातील आहेत.
सन 2010 साली बार कौन्सिलची निवडणूक झाली होती. त्यानंतर बोगस वकिलांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सनद पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक लांबली आहे. 13 सप्टेंबर 2016 पर्यंत सनद पडताळणी केलेल्या आणि 2010 नंतर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वकिलांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. बार कौन्सिलला खूप अधिकार आहे. सनद देणे प्रसंगी सनद रद्द करणे, वकील आणि न्यायाधीश यांच्यातील संबंध सलोख्याची राहण्यासाठी बार कौन्सील प्रयत्न करत असते. त्यामुळे या निवडणुकीला मोठी प्रतिष्ठा असून, राज्य, गोव्यातील वकिलांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. राज्य, गोव्यातील जिल्हा, तालुक्‍याच्या ठिकाणी मतदान होणार आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. व्हॉट्‌स ऍप, फेसबुकसह विविध सोशल माध्यमातून उमेदवार, त्यांचे ज्युनिअर्स आणि समर्थक प्रचार करत आहेत. निवडून आल्यावर काय करणार, वकिलाच्या हितासाठी कोणती भूमिका घेणार, याचा आशय सोशल मीडियावर टाकण्यात येत आहे. पारंपारिक पध्दतीने संपूर्ण राज्यभर फिरून गाठी-भेटीच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. ते कोणाला मत देणार, याबाबत वकील, न्यायालयीन घटकांमध्ये चर्चा आहे. तर्क-वितर्क केले जात आहेत.

नवोदित उमेदवारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

पदवीधर मतदार संघाप्रमाणे पसंती क्रमांक लिहून या निवडणुकीसाठी मतदान करावे लागते. मतदान करणाऱ्याला कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त 25 मते करता येतात. यापेक्षा कमी अथवा जास्त मते टाकल्यास ते मत अवैध ठरते. पसंतीचे 1 ते 5 आकडे लिहणे आवश्‍यक आहे. एखादा आकडा विसरल्यास अथवा न लिहल्यासही ते मतही बाद ठरते. या निवडणुकीत 40 ते 50 टक्के मतदार हे नवोदित आहेत. ते निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. मागील निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून 4 उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी एकाने बार कौन्सिलचे अध्यक्ष पदही भूषविले आहे. यावर्षी जिल्ह्यातील 22 पैकी किती उमेदवार विजयी होणार, याकडे वकिलांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)