बार्सिलोना दौरा अहवालावरून विरोधक आक्रमक

पिंपरी- पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या बर्सिलोना दौऱ्याचा अहवाल सादर करण्याची विरोधकांची मागणी जोर धरत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. तर या दौऱ्यात सहभागी झालेले विरोधी पक्षनेते दत्ता साने व मनसे गटनेते सचिन चिखले यांनी हा अहवाल स्वतंत्रपणे सादर करण्याची घोषणा केली आहे. महापौर राहुल जाधव यांनी या दोघांच्या सुरात सूर मिसळत, या दोघांबरोबर आपणही हा अहवाल सादर करू, अशी भूमिका घेतली आहे.

महापौर राहुल जाधव यांना स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित केलेल्या परिषदेचे आमंत्रण आल्यापासून या नियोजित दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली. मात्र सर्व पक्षांच्या गटनेत्यांना यात सामावून घेत, काही प्रमाणात का होईना विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करण्यात त्यांनी यश मिळविले. विरोधी पक्षनेत्यांसह अन्य पदाधिकारी या दौऱ्यासाठी अगोदरच स्पेनला रवाना झाले. स्वत: महापौर जाधव हे दोन दिवस उशिरा गेले. तोपर्यंत ही परिषद संपली होती. दरम्यान, महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांसवेत या दौऱ्याचे आमंत्रण नसलेले पुढारी देखील सहभागी झाले होते. तर काही ठेकेदारांच्या या दौऱ्यातील सहभागामुळे हा दौरा शासकीय होता की खासगी स्वरुपाचा, असा प्रश्‍न विरोधक करू लागले.

-Ads-

या दौऱ्यादरम्यान आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतलेली “सेल्फी’ सोशल मिडीयावर “व्हायरल’ झाल्याने, आगीत तेल ओतण्याचेच काम केले. दिवाळीदरम्यान महापालिकेतील वातावरण थंडावले होते. मात्र, एका दिवसाचा आटोपता दौरा असताना देखील बहुतांशी पदाधिकारी शहरात दाखल व्हायला 15 दिवसांचा कालावधी लागला. यातील सहभागी पदाधिकाऱ्यांनी हा संपूण दौरा स्वखर्चाने केल्याचा दावा केला आहे. तर ऐनवेळच्या 21 लाखांच्या खर्चाला स्थायीने नेमक्‍या कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी मान्यता दिली, याचा खुलासा अद्यापही झालेला नाही.

करदात्या नागरिकांच्या पैशातून महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांचे लाखो रुपये खर्चाचे होणारे परदेश दौरे निरर्थक असून, त्याचा शहराच्या विकासात कोणताही बदल दिसत नसल्याची टीका करत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी या दौऱ्याचा अहवाल सदर करण्याची मागणी केली होती. तर या दौऱ्यात सहभागी झालेल्या विविध गटनेत्यांनी देखील हा अहवाल सादर करण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली होती. मात्र, सत्ताधाऱ्यांबरोबरच खुद्द महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे देखील हा अहवाल सादर करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि मनसे गटनेते सचिन चिखले यांनी या दौऱ्याचा अहवाल आपण पत्रकार परिषद घेत, स्वतंत्रपणे सादर करण्याचे गुरुवारी (दि.29) महापालिका मुख्यालयात जाहीर केले. त्याकरिता दुपारी तीन वाजताची वेळ जाहीर केली. तत्पूर्वी महापौर राहुल जाधव यांनी देखील याबाबत पत्रकार परिषदेत अहवाल सादर करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र विरोध पक्षनेत्यांची वेळ आपल्या अगोदरची असल्याचे समजताच त्यांच्यासोबतच हा अहवाल सादर करण्याची तयारी दर्शविली आहे.

अनुत्तरित प्रश्‍नांची मिळणार उत्तरे
बार्सिलोनामधील नियोजित स्मार्ट परिषदेचे आमंत्रण नेमके कोण-कोणत्या पदाधिकाऱ्यांना होते? अन्य पदाधिकाऱ्यांचा या दौऱ्यात नव्याने समावेश करण्यात आला होता का? ठेकेदाराचा या दौऱ्यात सहभाग कोणत्या कारणांमुळे होता ? याबाबत सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अनेक नगरसेवकांना देखील उत्सुकता आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या पत्रकार परिषदेत या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)