पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 10 डिसेंबरला वाटप करण्यात येणार आहे. यानंतर ती विद्यार्थ्यांना वाटण्याचे नियोजन महाविद्यालयाच्या स्तरावरच करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वाटप व फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या व चलन स्वीकृती एकाच दिवशी होणार आहे. यासाठी विभागनिहाय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत या केद्रांत कामे चालणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी शिवाजीनगर येथील विभागीय मंडळात केंद्र असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी अहमदनगरमधील ए.ई.सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व श्रीरामपूरमधील के.जे.सोमय्या हायस्कूल, सोलापूर जिल्ह्याकरीता सोलापूरमधील मुरारजी पेठ येथील छत्रपती शिवाजी प्रशाला, पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे केंद्रे असणार आहेत, अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांकडून कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा