बारावीच्या परीक्षा यंदाही संकटात!

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना राज्य शासनाने दिलेल्या लिखित आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने उद्यापासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच बारावी परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता बारावीच्या परीक्षांपुढे संकट उभे राहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मागील साडेचार वर्षांत शिक्षणमंत्र्यांनी अनेकदा बैठक घेऊन मागण्या मान्य केल्या. तसेच लिखित आश्‍वासनही दिले. परंतु, ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे संघटनेने राज्यभर टप्पाटप्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,’ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले.

दि. 11 जानेवारी रोजी राज्यातील सर्व तालुका तहसीलदारांमार्फत शासनासह सर्व आमदारांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. यानंतर दि. 18 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन तसेच शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन दिले जाणार आहे. दि. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीदिवशी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय मंडळ कार्यालयावर मूक मोर्चे काढण्यात येणार आहे. फेब्रुवारीत इयत्ता बारावीच्या परीक्षा असून याकाळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षाकाळात होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असेही देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)