बारामती परिमंडलातील 47 हजार थकबाकीदारांची वीज खंडित

महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेचा तडाखा : आज, उद्या वीजबिल भरणा केंद्रे सुरू

बारामती : महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या 47 हजार 438 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यात “शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने गुरुवारी (दि. 29) व शुक्रवारी (दि. 30) महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बारामती परिमंडलात वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी “शून्य थकबाकी’ची विशेष मोहिम सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत बारामती, सातारा व सोलापूर मंडलात 11 कोटी 12 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 47 हजार 438 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्‍यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 3 हजार 189 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 2 कोटी 16 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील 4 हजार 343 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 85 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. तर सोलापूर मंडलातील 39 हजार 906 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 8 कोटी 11 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे गुरुवारी, शुक्रवारी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुटीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच एप्रिल महिन्यातही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)