बारामती नगर पालिकेच्या “स्मार्ट स्कूल’

  • कृतीयुक्‍त अध्ययनप्रणाली कार्यन्वित : गरिब विद्यार्थ्यांना मिळतेय “हायटेक’ शिक्षण

दीपक पडकर
जळोची – बारामती नगर पालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय झाली होती. नगर पालिका प्रशासनाच्या व शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून शाळा “हायटेक’ होऊ लागल्या आहेत. नगर पालिकेच्या शाळांमध्ये कृतीयुक्‍त अध्ययन प्रणाली कार्यन्वित केल्यामुळेच नगर पालिकेच्या शाळा “स्मार्ट स्कूल’ बनल्या असल्याने गरिबांच्या मुलांना “हायटेक’ शिक्षण मिळून लागले असल्याने नगर पालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
बारामती नगर पालिकेच्या आठ शाळांमध्ये मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नवीन कृतीयुक्‍त अध्ययन प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. आठ शाळांमध्ये 2 हजार 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गुणवत्ता वाढविण्यासाठी व सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय लॅब, गुणवत्तापूर्ण दर्जा उंचावण्यासाठी पालिका व शिक्षण विभागणे ठोस निर्णय घेत या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरू झाली आहे. पियाजो उद्योग समुह, रोटरी क्‍लब, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया अशा विविध संस्थांनी सीएसआर फंडातून संगणक लॅब, प्रोजेक्‍टर, स्क्रीन टीव्ही दिल्यामुळे हा प्रकल्प राबविणे शक्‍य झाले असल्याने शाळा “हायटेक’ झाल्या आहेत. नगर पालिकेने 31 शिक्षकांची नुकतीच नियुक्‍ती केली आहे.
बारामती पालिकेच्या आठ शाळांच्या भिंतींवर कार्टून, संगीत साहित्य, वृक्ष आदींची चित्रे काढली असल्याने या शाळा बोलक्‍या झाल्या आहेत. शाळांचा दर्जा गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन स्तरावरून “जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू केला आहे. यात डिजिटल शाळांविषयी उल्लेख करण्यात आला असल्याने बारामती नगर पालिकेच्या शाळांमधील वर्ग डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यामुळेच शक्‍य झाले असल्याचे शिक्षणाधिकारी एम. पी. पवार यांनी प्रभातला सांगितले.

  • अत्याधुनिक सोयी उपलब्ध
    बारामती नगर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इतर खासगी शाळांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक त्या सुविधांबरोबरच अत्याधुनिक सोयी उपलब्ध केल्या आहेत. महागाड्या शाळाप्रमाणेच नगर पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम, संगणक,सुसज्ज आसन व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, तसेच नियमित स्वच्छ स्वच्छतागृह, प्रथमउपचारपेटी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व व्यक्तिमत्व विकासाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्‍तीश: लक्ष दिले जाते.

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ यामध्ये शाळा डिजिटल होणे गरजेचे होते. शाळा स्तरावर सीएसआर, लोकसहभाग आदींनी सहकार्य केले आहे. कृतीयुक्त अध्ययन प्रणाली कार्यन्वित झाल्यामुळे गुणवत्ता वाढ झाली आहे.
– एम. पी. पवार, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी

नगर पालिकेच्या शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी शिक्षणविभाग विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत आहे. भविष्यात असे आणखी विविध उपाययोजना करण्यात येतील.
– योगेश कडूसकर मुख्याधिकारी

खासगी शाळेत हजारो रुपये फी भरावी लागते. मात्र, नगर पालिकेच्या शाळांमधून मोफत दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांवर होणाऱ्या शैक्षणिक खर्चाची मोठी बचत होत आहे. ज्या सुविधा खासगी शाळांमध्ये दिल्या जातात, त्या सुविधा नगर पालिकेच्या शाळांमध्ये दिल्या जात असल्याने मुलांच्या ज्ञानात भर पडत आहे.
– केशव काळे, पालक, बारामती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)