बारामती ते चौंडी आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचा प्रयत्न

रेडा- धनगर समाजातील युवकांनी व बांधवांनी बारामती ते चौंडी पर्यंत केलेल्या आंदोलनात जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. पुण्यश्‍लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती महोत्सव इंदापूर येथे पांडुरंग मारकड मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रा. राम शिंदे बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार नारायण पाटील, आमदार रामहरी रूपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, भारत मारकड, बापू रेडके, शिवाजी तरंगे, श्रीकांत पाटील, विलास वाघमोडे, सागर कवितके, दत्तात्रय शिंगाडे, महादेव पांढरे, पोपट पवार, सौरभ भिसे, विलास गडदे, शिवाजी शिंगाडे, विवेकानंद सामसे, पोपट पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे,म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लोकशाही मार्गाने सनदशीर लढा दिला पाहिजे; परंतु चौंडी येथे समाजाचे अहल्यादेवी होळकर हे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी वेगळे प्रकार नको होते. समाज बांधवांना एकत्र आणून कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न लावता जर जयंती महोत्सव साजरा होत असेल तर याला उगीच राजकीय रंग दिला जावू नये, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी सरकारची शिफारस देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत, व ही शिफारस तसेच आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी काही दिवसांतच यशस्वी प्रयत्न करणार आहे; परंतु धनगर समाजाने श्रद्धास्थानाचे महत्त्व वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी विविध क्षेत्रातील पाच व्यक्‍तींचा विषेश सन्मान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. दरम्यान, मान्यवरांचे स्वागत अहल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग मारकड, पंचायत समितीचे सदस्य महेंद्र रेडके, दत्ताभाऊ पांढरे,यांनी केले. पंचायत समितीचे सदस्य सतिश पांढरे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी इजगुडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी थोरात, पोपट पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन आरडे, अजिंक्‍य रेडके, संदिप रेडके, हरीदास सामसे उपस्थित होते.

संघटीत व्हा, तरच आरक्षण मिळेल
राज्य सरकारने शिफारस दिल्याशिवाय केंद्र सरकार आरक्षण देण्यासाठी सहमती देणार नाही. भाजपने निवडून येण्या आगोदर धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कबूल केले होते; परंतु शब्द पाळला नाही, म्हणून थेट रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन धनगर समाजाने उभे केले पाहिजे व संघटीत झाले पाहिजे असे मत आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.

बंधाऱ्यांची दुरूस्तीसाठी निधी द्या
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, जलसंधारणाची कामे अहल्यादेवी यांनी केली व त्यांचे वंशज म्हणून योगायोगाने राम शिंदे यांच्याकडे जलसंधारणाची खाते आलेले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील जुन्या बंधाऱ्यांची कामे करण्यासाठी जलसंधारण मंत्री शिंदे यांनी निधी द्यावा. तसेच मंत्री शिंदे यांनी आपल्या जलसंधारणाच्या कामातून अहल्यादेवीचा वसा जोपासला पाहिजे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)