कांदा फुकट न्या; स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका : शेतकऱ्याची कांदेगिरी

दर कोसळत असल्याने नोंदवला अनोखा निषेध


दानपेटीतील पैसे पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवणार

बारामती – कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथे शेतकऱ्याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाऱ्यांनी स्वेच्छेने दान पेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येणार आहेत. असा फलक याठिकाणी लावून या शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

बारामती नगरपालिकेसमोर जैनकवाडी येथील तरूण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयस व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला. दिनेश काळे म्हणाले, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये कांद्याची लागवड केली. दीड एकरात 150 बॅग कांदा झाला. त्यापैकी 120 बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ 12 हजार रूपयांमध्ये विक्री केली. कांद्यासाठी एकरी 45 हजार रूपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ 12 हजार रूपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. स्वेच्छेने काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. शासनाला शेतकऱ्याची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, असे काळे यांनी सांगितले. तर दिनेश यांच्या सोबत 8 वीत शिकणारा त्यांचा मोठा मुलगा श्रेयश व सहावीत शिकणारा लहान मुलगा प्रसाद देखील शाळेचा दिवस बुडवून वडिलांना मदत करत होते.

दरम्यान, कांदा फुकट विक्रीसाठी मांडल्याचे लक्षात आल्यानंतर याठिकाणी या शेतकऱ्याची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. उत्पादन व उत्पन्न यातील तफावत समजुन घेत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शासन गंभीर नसल्याचीही चर्चा याठिकाणी रंगली होती. काही नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन त्यांच्या अनोख्या आंदोलनाना आपला पाठिंबा व्यक्‍ता केला. तर अनेकांना कांदा घेऊन जात दानपेटीमध्ये पैसेही टाकले.

उपरोधीक फलक
शेतकरी बांधवांना मागील 4 वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावर खुश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर अभिनंदन’ असा उपरोधिक मजुकूर देखील लिहला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
5 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)